3.21 कोटींच्या धान घोटाळ्यात गुन्हा दाखल
गोंदिया: हमीभाव धान खरेदी केंद्रावर गत तीन वर्षात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे समोर आले. याप्रकरणी न्ययालयाने दिलेल्या निर्देशानुसार गोरेगाव तालुक्यातील चिचगाव येथे झालेल्या 3 कोटी 21 लाख 3 हजार 333 रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी मेघनाथ तेजलाल टेंभरे (40) याच्याविरोधात न्यायालयाच्या निर्देशावरुन गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
जिल्ह्यातील हमीभाव धान खरेदी केंद्रांवर रब्बी व खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात अनेक संस्थांनी घोळ केला होता. धानाची खरेदी न करताच धान खरेदी केल्याचे दाखविण्यात आले होते. तर काही ठिकाणी शासनाला धानही दिले नव्हते. असाच प्रकारे 2021-22 या वर्षात गोरेगाव तालुक्यातील चिचगाव येथील कृषी विकास साधन सामुग्री पुरवठा बहुउद्देशीय सहकारी संस्थेत देखील घडला. त्यामुळे संस्थाध्यक्ष जितेंद्र बाबूलाल कटरे यांनी आरोपी मेघनाथ तेजलाल टेंभरे याने घोळ केल्यामुळे त्याच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. आरोपी मेघनाथ टेंभरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करावा किंवा यापूर्वी 3 फेब्रुवारी 2023 ला दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात आरोपी करुन सखोल तपास करावा, अशी विनंती याचिकेत केली होती. ती याचिका प्रथमश्रेणी दंडाधिकारी न्यायालय 4 यांनी मान्य करुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तीन महिन्यांच्या आत अहवाल सादर करावा, असे निर्देश गोरेगाव पोलिसांना दिले होते. त्यानुसार गोरेगाव पोलिसांनी पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार आरोपी मेघनाथ टेंभरे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण रासकर करीत आहेत.