होळी स्पेशल ! मध्यरात्रीपर्यंत मद्यविक्री राहणार सुरू
⬛️गृहविभागाने जारी केला आदेशः निर्बंधांचे पालन करूनच ढोसा दारू
गोंदिया⬛️ महाराष्ट्र सरकारने मद्यप्रेमींना मोठा दिलासा दिला असून, महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने जारी केलेल्या आदेशात होळी, रंगपंचमीच्या रात्री आणखी दीड तास दारूची दुकाने सुरू राहतील, असे म्हटले आहे.
वास्तविक, आतापर्यंत ही दारूची दुकाने रात्री साडेदहा वाजेपर्यंतच सुरू असतात, मात्र २४ मार्चला सरकारने दुकाने रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. यासंदर्भातील पत्र उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी जिल्हा दंडाधिकारी, सर्व अधीक्षक (राज्य उत्पादन शुल्क) आणि परवाना प्राधिकरणांना पाठविले आहे. होळी, रंगपंचमी या विशेष सणाच्या पार्श्वभूमीवर, रविवार, २४ मार्चला होळीच्या रात्री, एफएल-२ (वाइन शॉप), (वाइन शाप), एफएलबीआर-२ (बीअर शॉपी- फक्त पार्सल सुविधा) आणि एफएलडब्ल्यू-२ (फक्त बाटलीबंद वाइन विक्री) या महानगरपालिका क्षेत्रात सीलबंद दारूविक्री परवान्याची वेळ रात्री १०.३० ते सकाळी १२ वाजेपर्यंत वाढविण्यास मान्यता देण्यात आली. मात्र, प्रस्तुत प्रस्तावाच्या आदेशात, कायदा व सुव्यवस्था लक्षात घेऊन ज्या जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी आदेश काढतील, त्या जिल्ह्यांत दुकाने त्यांच्या निश्चित वेळेपर्यंतच सुरू राहतील, असे सांगण्यात आले. २०२४ हे निवडणुकीचे वर्ष असल्याने परवानाधारकांनी (परवानाधारक) १२ मार्चला पत्र पाठवून मागणी केली होती. ती मागणी मान्य करून सूचना देण्यात आल्या होत्या. अशा स्थितीत दारूची दुकाने निर्धारित वेळेपेक्षा दीड तास अधिक उघडी ठेवल्यास सरकारलाही आर्थिक फायदा होईल, असे जाणकारांचे मत आहे. मात्र निर्बंधांचे पालन करूनच मद्यप्राशन करता येणार आहे. पोलिस प्रशासनाने हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची संपूर्ण तयारी केली आहे.