शिक्षकांना जिल्हा परिषदेत… नो एंट्री! घ्यावी लागेल गटशिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी
गोंदिया ⬛️–गोंदिया जिल्हा परिषदेत नव्यानेच रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानथम यांनी गेल्या तीन चार वर्षापासून विस्कटलेली जिल्हा परिषदेची परिस्थिती सुधारण्याचा चंग बांधल्याचे दिसून येत आहे.रुजू झाल्यापासूनच त्यांनी पारदर्शक कामाला प्राधान्य दिल्याने पवित्र पोर्टल अंतर्गत आलेल्या 390 शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या इतिहासात विना पैशाने शाळा मिळाली.तर रात्री 12 वाजेपर्यंत कार्यालयात काम करुन सर्वच विभागाचा आढावा घेत कर्मचारी व अधिकारी यांना लोकसेवक कायद्याप्रमाणे वेळेच्या आत काम करण्याचे निर्देश दिले.
शिक्षण विभागातंर्गत येणाऱ्या पंचायत समिती अंतर्गतच्या शिक्षण विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक, शिक्षक,सहा.शिक्षक व इतर कर्मचारी यांना शाळा सोडून तसेच कार्यालय सोडून बिना परवानगीने जिल्हा परिषदेच्या शिक्षण प्राथमिक विभागात येण्यास मज्जाव घालण्यात आलेला आहे.शिक्षक व सदर कर्मचारी हे शाळेच्या व कार्यालयीन वेळेत अधिकारी कर्मचारी शिक्षण विभागात सतत येत असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम पडण्याची शक्यता असल्याने यापुढे ज्या कुणाला शिक्षण विभागात यायचे असेल त्यांनी पंचायत समिती स्तरावरील गटशिक्षणाधिकारी यांची लेखी स्वरुपाची पुर्व परवानगी घेतल्याशिवाय येऊ नये असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंंथम यांनी काढले आहेत.या लेखी आदेशामुळे शिक्षण विभागात कार्यरत शिक्षकांमध्ये चांगलीच धडकी भरली असून संघटनेच्या नावावर शाळेत शैक्षणिक कार्य सोडून सातत्याने जिल्हा परिषदेच्या परिसरात फेरफटका मारणाऱ्या शिक्षकांना मात्र मुकाअच्या या आदेशाने फटका बसला आहे.