सणाच्या तोंडावर डाळीचे भाव कडाडले

गोंदिया ⬛️उन्हाळ्याची सुरूवात झाली असुन वर्षभरासाठी आवश्यक असलेल्या डाळी, धान्य खरेदीची लगबग सुरू झाली आहे. बाजारात विविध प्रकाराच्या डाळी ब्रिक्रीसाठी आल्या आहेत. तूर डाळ प्रति किलो १५० ते१६० रूपये पाहून सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. हे दर परवडत नसल्याने अनेकांच्या स्वयंपाक घरातून डाळ गायब झाली आहे.

दुसरीकडे कडधान्य, डाळी महागल्याने शेतकरी आश्चर्य व्यक्त करीत आहेत. उत्पादन कमी व मागणी वाढल्याने डाळी महागल्या आहेत. त्यामुळे गरीब, कष्टकरी, शेतकरी यांना डाळ खाणे परवडेना झाले. होडी, धुळवड व पाडवा सणाच्या तोंडावर डाळी महागल्याने मध्यम वर्गीय व गरीब समाजाचे बेहाल होत आहेत. तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने वरण, भात व पोळया अथवा ज्वारीच्या भाकरी दैनंदिन जेवणात असतात . त्याचप्रमाणे भाजीपाल्याचे दर वाढल्याने पर्याय म्हणून डाळ वापरायची असे बहूतांश घरांमध्ये असते. शेतकरी कुटुंबात सुद्धा डाळ, भाकर, ठेचा, बेसन हा बेत सहसा दररोज असतोच. काही दिवसांपासून महागाई वाढल्याने उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ लावणे सामान्य गृहिणींना बवघड होत आहे. घरोघरी महिलांचे मासिक बजेट कोलमडले आहे. सततची नापिकी, शेतमालास नसलेला भाव यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत, मात्रगत काही दिवसात डाळीचे दर वधारले आहेत. तूर डाळ प्रति किलो १५० ते१६०रूपये झाली आहे. ही वाढ प्रति किलो ३० ते ४० रूपयांची असल्याने सांगण्यात आले. हे दर अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यासोबतमुग, उडीद, मसूर, चना डाळीचे भावही वाढले आहेत . मुग डाळ प्रति किलो १०० वर गेली आहे. आवक कमी झाल्याने उत्पादन व मागणीत तफावत वाढली आहे. दारिद्रय रेषेखालील व अत्यल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबीयांना रेशन दुकानावर मोफत गहू, तांदूळ वितरीत केले जात आहेत. धान्य पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना घरात खायला विविध डाळी व ज्वारी खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. ज्वारीही प्रति क्विंटल ४ ते ५ हजार रूपये झाली आहे. सध्या होळी, धुलीवंदन, गुढी पाडव्याची लगबग सुरू असताना महागाईने डोके वर काढले आहे.

Share