गोंदियातील अंगणवाड्या सकाळ पाळीत भरवा
गोंदिया : जिल्ह्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. अंगणवाडीत शिक्षण घेणार्या चिमुकल्यांना वाढत्या उन्हाचा त्रास सहन करावा लागतो आहे. करिता जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या सकाळ पाळीत भरविण्यात याव्यात, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती सविता पुराम यांनी जिल्हाधिकारी यांना गुरुवार 14 मार्च रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील अंगणवाड्यांची वेळ सध्या सकाळी 10 ते दुपारी 2 अशी आहे. अंगणवाड्यांमध्ये 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालके पूर्व प्राथमिक शिक्षण घेतात. सध्या जिल्ह्याचे तापमान 38 डिग्री सेल्सिअसवर गेले आहे. येत्या काही दिवसांत तापमानाचा पारा आणखीनच वाढणार आहे. बालकांना उन्हाचा त्रास जाणवू नये म्हणून काही ठिकाणच्या शाळा सकाळ पाळीत भरविण्यात येत आहेत. चिमुकल्यांच्या आरोग्याचा विचार करून जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या सकाळी 7 ते 10 या वेळेत भरविण्यात याव्यात, अशी मागणी सविता पुराम जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.