उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी – जिल्हाधिकारी

गोंदिया : वातावरणीय बदल व तापमानात झालेली वाढ लक्षात घेता, पुढील दोन ते तीन महिने उष्णतेची लाट राहणार असा अंदाज आहे. उष्णतेच्या लाटेमुळे शारिरीक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता असते. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी सांगितले.

         जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आज उष्माघात पुर्वतयारी व आराखडा अंमलबजावणी बाबत आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. अपर जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहरे, अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, उपविभागीय अधिकारी सर्वश्री सत्यम गांधी, पर्वणी पाटील, पुजा गायकवाड, वरुणकुमार सहारे यांची यावेळी मंचावर उपस्थिती होती.

       जिल्हाधिकारी श्री. नायर म्हणाले, सहव्याधी असणाऱ्या व्यक्तींना उष्णतेचा तडाखा बसण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे लहान मुले, गरोदर महिला, वृध्द व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक व आजार असणाऱ्यांनी या काळात अधिक खबरदारी घ्यावी. येणारे दोन अडीच महिने कसोटीचे असून या काळात आरोग्य विभागाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.

       गोंदिया जिल्ह्यात अधिकतम तापमान सन मे 2016 मध्ये 47.2, 2021 ला 45.90, 2022 ला 46.2 व 2023 मध्ये 46.7 डिग्री सेल्सिअस नोंद झालेली आहे. ही बाब लक्षात घेता, नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. निकडीचे काम असल्याशिवाय उन्हात बाहेर पडू नये, घराबाहेर जातेवेळी रुमाल अवश्य बांधावा, डोळ्यावर गॉगल लावावा, उन्हातुन आल्याबरोबर फ्रिज मधील थंड पाणी पिऊ नये, ताक, निंबू पाणी प्यावे, पाणी भरपूर प्रमाणात प्यावे, शक्यतो सावलीचा आसरा घ्यावा, आजारी व्यक्तींनी उन्हात जाऊ नये, ऊन लागल्याचे लक्षात येताच त्वरित 108 अथवा 102 क्रमांकावर फोन करावा किंवा जवळच्या रुग्णालयात उपचार घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.

      सेवाभावी संस्थाच्या माध्यमातून गर्दीच्या ठिकाणी सेवार्थ पाणपोई सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. आता लग्न सराईचे दिवस सुरु होणार आहेत. या काळात उष्माघात होण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे. उपाशीपोटी जास्त वेळ राहणे सुध्दा उष्माघाताचे कारण होऊ शकते. घराच्या छताला पांढरा रंग (चुना) लावला तरी दोन ते तीन डिग्री तापमान कमी होण्यास मदत होते. उन्हापासून बचाव करण्यासाठी काळजी व खबरदारी घेणे आवश्यक असून नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

       उष्माघाताची कारणे :- उन्हात शारिरीक श्रमाचे, मजुरीची कामे फार वेळ करणे, कारखान्यांचे बॉयलर रुममध्ये व काच कारखान्यात काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे, उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येणे हे उष्माघात होण्याची कारणे आहेत.

       उष्माघाताची लक्षणे :- शरिरास घाम सुटणे, तहान लागणे, शरीर शुष्क होणे, थकवा येणे, ताप येणे (102 पेक्षा जास्त), त्वचा कोरडी पडणे, भुक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी, अस्वस्थ, बेशुध्दावस्था, उलटी होणे, डोळ्याला अंधारी येणे इत्यादी.

       प्रतिबंधात्मक उपाय :- कष्टाची कामे शक्यतो सकाळी लवकर अथवा सायंकाळी कमी तापमान असतांना करावी, उष्णता शोषून घेणारे भडक रंगाचे कपडे वापरु नयेत, सैल व उष्णता परिवर्तीत करणारे पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत, भरपूर प्रमाणात पाणी-शरबत प्यावे, सावलीत विश्रांती घ्यावी, शक्यतो उन्हात फिरणे टाळावे, आवश्यक कामे असल्यास उन्हात जाण्यापूर्वी भरपूर पाणी प्यावे अथवा लिंबू शरबत प्यावे, उन्हात जाण्या अगोदर जेवण करावे, रिकाम्यापोटी उन्हात जाऊ नये, डोक्याभोवती पांढरा रुमाल गुंडाळावा, गॉगल व हेल्मेटचा वापर करावा, ज्येष्ठ नागरिक व बालकांना उन्हात फिरु देऊ नये.

उष्माघातावर उपचार :- रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखा व कुलर वातानुकूलिताची व्यवस्था करावी, रुग्णाच्या शरिराचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, रुग्णास बर्फाच्या पाण्याने आंघोळ घालावी, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवाव्यात, आईस पॅक लावावेत, ओआरएस सोल्युशन द्यावे, उन्हामुळे उष्माघाताचे रुग्णावर उपाययोजना करण्यासाठी व मृत्यू टाळण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, आयुर्वेदिक दवाखाने व इतर आरोग्य संस्थांनी आवश्यक ती सर्व तयारी करुन ठेवावी.

Print Friendly, PDF & Email
Share