सरपंचाची ग्रामसेवकास मारहाण
गोंदिया: सालेकसा तालुक्यातील दरबडा येथील ग्रामसेवकास मारहाण करणार्या सरपंचावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युुनियन गोंदिया संघटनेने तहसीलदार, पोलिस निरिक्षकांसह जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनानुसार, दरबडा येथील ग्रामसेवक अरुण सिरसाम हे सालेकसा तहसील कार्यालयात कार्यालयीन कामाकरीता आले असता त्यांना बाहेर बोलावून सरपंच तमिल टेंभरे यांनी त्यांच्या मर्जीतील लोकांची नावे अतिवृष्टी नुकसान यादीत वाढविण्याची मागणी केली. त्यावर ग्रामसेवक सिरसाम यांनी यादी प्रशासनाकडे सादर झाल्यामुळे नाव वाढविणे शक्य नसल्याचे सांगितले. नाव वाढविण्याच्या मुद्याला घेऊन सरपंच व सचिव हे तहसीलदारांकडे आले असता त्यांनीही नाव वाढविता येणार नसल्याचे सांगितले. दरम्यान तहसीले कार्यालयाबाहेर येताच ग्रामसेवकासोबत वाद घालून सरपंचाने आपल्या साथीदारासह मारहाण केली व देवरी येथील निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमाला सुद्धा जाऊ दिले नाही. तसेच संविधानिक पदावर असताना सरपंचानी केलेले कार्य चुकीचे असून ग्रामसेवक संघटना या घटनेचा निषेध नोंदवित असून तात्काळ याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. तसेच जोपर्यंत गुन्हा दाखल करुन अटक केली जात नाही,तोपर्यंत ग्रामसेवक संघटनेच्यावतीने जिल्ह्यात कामबंद आंदोलन करतील अशा इशारा दिला आहे. निवेदन देताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन, रामेश्वर जमईवार, कुलदिप कापगते व तालुक्यातील सर्व ग्रामसेवक उपस्थित होते.