‘हरहर महादेव’ जयघोषाने जिल्हा दुमदुमला
गोंदिया : जिल्ह्यातील प्रसिद्ध शिवमंदिरासह ठिकठिकाणच्या महादेव मंदिरात आज, 8 मार्च रोजी महाशिवरात्रीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटेपासून मंदिरांमध्ये ‘हरहर महादेव’च्या गजरात भाविकांनी भक्तीभावाने शिवशंकराची पुजन केले. यादरम्यान देवस्थान समिती, सामाजिक संघटना व राजकीय पक्षातर्फे महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
जिल्ह्यातील ऐतिहासिक व पंचक्रोषित प्रसिद्ध प्रतापगड येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त सर्वात मोठी यात्रा भरते. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रतापगड येथे लाखो भाविकांनी महादेवाचे दर्शन घेतले. जिल्हा प्रशासनासोबत स्थानिक प्रशासनाने भाविकांसाठी चोख व्यवस्था केली होती. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्याकडून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यासोबतच गोंदियाजवळील नागरा, कामठा, केळझरी, शिवधाम, सालेकसा तालुक्यातील त्रिलोकेश्वर धाम, गडमाता, पिंडकेपार, आमगाव व जवळील महादेव मंदिर, मांडोदेवी, सडक अर्जुनी तालुक्यातील खोबा, गोरेगाव तालुक्यातील खोबा, देवरी तालुक्यातील धुकेश्वरी मंदिर या प्रसिद्ध मंदिरासह जिल्ह्यातील सर्वच लहानमोठ्या मंदिरात सकाळपासूनच भाविकांची गर्दी झाली. मंदिरात पहाटेपासूनच धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली होती.
अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमासह शिवकथा, हवन आदींचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शहरासह ग्रामीण भागातही फळ, मिठाई, फुलं व पुजन साहित्याची दुकानांवर सकाळपासूनच नागरिकांची गर्दी दिसून आली. शिवभक्तांनी मनोभावे महादेवाचे पुजन करुन हरहर महादेवचा जयघोष केला. अनेकठिकाणी यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यात्रा व शिवजयंतीनिमित्त स्थानिक मंदिर विश्वस्तांनी भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध केल्या होत्या. तसेच सामाजिक संस्था, राजकीय पक्षांतर्फे भाविकांसाठी पिण्याचे पाणी, महाप्रसाद आदीचे वितरण केले. तर स्थानिक प्रशासन व जिल्हा प्रशासनातर्फे भाविकांची सुरक्षा, आरोग्य व दळणवळणाच्या सोयी उपलब्ध करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे, यंदा लोकसभेची निवडणूक काही महिन्याने होणार असल्याचे शहरी व ग्रामीण भागातील मंदिर परिसरासह, मुख्य मार्गांवर संभाव्य व इच्छूक उमेदवारांच्या शुभेच्छा फलक व बॅनर्सची गर्दी दिसून आली. तसेच अनेक संभाव्य उमेदवारांनी पिण्याचे पाणी, शरबत, महाप्रसादाचे वितरण केले.