पशुसंवर्धन विभागात 70 टक्के पदे रिक्त, पशूसंवर्धन कसे होणार?
गोंदिया: जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागात 70 टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे पशुपालकांना जनावरांच्या उपचारासाइी अडचण येत असून खासगी डॉक्टरांकडून उपचार करुन घ्यावे लागत आहेत.
जिल्ह्यात आठ तालुके असून त्यातंर्गत 41 प्रथम श्रेणी पशुवैद्यकीय दवाखाने, 30 द्वितीय श्रेणीचे दवाखाने व एक फिरता दवाखाना असे 72 दवाखाने पशुपालकांच्या जनावरांवर उपचार करण्यासाठी उपलब्ध आहेत. मात्र मंजूर पदांपैकी अनेक पदे रिक्त असल्याने कार्यरत अधिकारी व कर्मचार्यांना उपचार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तर पशुपालकांना प्रसंगी खासगी डॉक्टरांकडून जनावरांवर उपचार करुन घ्यावे लागतात. जिल्ह्यात पशुधन विकास अधिकार्यांची 49 पदे मंजूर असताना फक्त 26 पदे भरली आहेत. तर 23 पदे रिक्त आहेत. पट्टेधारकांची मंजूर संख्या 34 असून 23 पट्टेधारक कार्यरत असून 11 जागा रिक्त आहेत. पर्यवेक्षकांची 40 पदे मंजूर असून 29 पदे भरलेली असून 11 पदे रिक्त आहेत. तर परिचरांची 87 पदे मंजूर असून त्यापैकी 62 पदे भरलेली असून 25 पदे रिक्त आहेत. सरासरी 70 टक्के पदे रिक्त असल्याने जिल्ह्यातील गोपालक, शेतकर्यांच्या पाळीव जनावरांना उपचार घेण्यासाठी खासगी मदत घ्यावी लागत आहे.