वर्षभरात ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक वापरासाठी १० दिवस जाहीर तर ५ दिवस राखीव

केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) सुधारीत नियम २०१७ अन्वये तसेच ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० च्या नियम ५(३) नुसार, ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा श्रोतगृहे, सभागृहे, सामाजिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागाखेरीज इतर ठिकाणी, ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी ६ वाजेपासून ते रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी देण्यासाठी, सन २०२४ करीता १० सवलतीचे दिवस निश्चित करण्यात आले असून त्यापैकी ५ दिवस राखीव ठेवण्यात आले आहे.

केंद्र शासनाच्या १० ऑगस्ट २०१७ रोजीच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम २०१७ व त्यासोबत दिलेल्या स्पष्टीकरणात्मक टिपणीनुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादींच्या वापराबाबत श्रोतुगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृह आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार, वर्षांमध्ये १५ दिवस निश्चित करून सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत सूट जाहीर करण्याकरीता संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

हे आहेत सवलतीचे दिवस व सवलतीचे प्रयोजन :

शिवजयंती करिता १ दिवस सवलत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त (१४ एप्रिल) १ दिवस आणि ईद-ए-मिलाद करीता १ दिवस, अनंत चतुर्दशी व गणेश उत्सवाकरीता (१७ सप्टेंबर) इतर २ दिवस असे एकूण ३ दिवस निश्चित, नवरात्रोत्सव व अष्टमीकरीता (१० व ११ ऑक्टोबर) २ दिवस, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन (१६ ऑक्टोबर) १ दिवस, ३१ डिसेंबर १ दिवस व ५ दिवस राखीव ठेवण्यात आले आहे.

राखीव ठेवण्यात आलेल्या ५ दिवसाच्या बाबतीत तसेच गणेश उत्सवाच्या व इतर २ दिवसाबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येईल. निश्चित करण्यात आलेल्या सवलतीच्या दिवशी सक्षम प्राधिका-यांकडून परवानगी घेऊनच त्यांनी ठरवून दिलेल्या अटी व शर्ती प्रमाणेच ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर करता येईल, असे जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.

Print Friendly, PDF & Email
Share