अकरा तलवारींसह एकाला अटक

गोंदिया : स्थानिक गुन्हे शाखा पथकाने 20 फेब्रुवारी रोजी जवळील फत्तेपूर येथे एका घरी छापा टाकून अकरा तलवारीसह एकाला अटक केली. बादल दलित खोब्रागडे (27) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.आगामी निवडणुका व जिल्ह्यात वाढते गुन्हे लक्षात घेत पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांनी अवैधरित्या शस्त्र बाळगणार्‍याविरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यातंर्गत स्थानिक गुन्हे शाखा पोलिस जिल्ह्यात अवैधरित्या शस्त्रे, हत्यार बाळगणार्‍या गुन्हेगारांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करीत आहे. यातंर्गत 20 फेब्रुवारी फत्तेपूर येथे बादल खोब्रागडे याने आपल्या घरी घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने अवैधरित्या शस्त्रे बाळगल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे स्थागुशाचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनात दोन पथकांनी बादल खोब्रागडे याच्या घरी धाड टाकून घराची तपासणी केली असता स्वयंपाक घरात एका पोतडीत 11 हजार किमतीच्या स्टीलची मूळ व लोखंडी पाते असलेल्या 11 तलवारी अवैधरित्या वागळल्याचे आढळले. दरम्यान पोलिसांनी त्याला तलवारीबद्दल विचारणा केली असता त्याने सदर तलवारी त्याचा आतेभाऊ गौतम उर्फ निगम उर्फ गामा संजय वाहाणे रा. वाजपेयी वॉर्ड, गोंदिया याने आपल्या घरी आणून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी तलवारी जप्त करुन बादल खोब्रागडे याला अटक केली आहे. याप्रकरणी गंगाझरी पोलिसांनी बालक खोब्रागडे व गौतम वाहाणे यांच्याविरोधात कलम 4, 25 भारतीय हत्यार कायदा, सहकलम 37 (1), (3), मुंबई पोलीस अधिनियम सन 1951, कलम 135 मपोका अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास गंगाझरी पोलीस करीत आहेत.

Share