एकोडीची शाळा ठरली आदर्श शाळा

गोंदिया◾️ जिल्ह्यात अदानी फाउंडेशन व जिप प्राथमीक शिक्षण विभागातर्फे आमची शाळा आदर्श शाळा उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे तालुका व जिल्हा पातळीवर नुकतेच मूल्यांकन करण्यात आले. यात गोंदिया तालुक्यातील जिप प्राथमिक शाळा एकोडीने प्रथम, आमगाव तालुक्यातील ब्राम्हणी शाळेने द्वितीय तर देवरी तालुक्यातील उचेपूर व तिरोडा तालुक्यातील चोरखमारा येथील जिप प्राथमीक शाळांनी संयुक्तरित्या तृतीय क्रमांक पटकावला आहे. या शाळांना अदानी फाउंडेशनच्या सीएसआर निधीतून रोख, प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

विविध कारणाने जिल्हा परिषदेच्या शाळा नेहमीच चर्चेत राहतात. असे असले तरी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षण विभाग नेहमीच धडपडतो. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, भौतिक सुविधा, स्पर्धात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा या हेतूने तिरोडा येथील अदानी फाउंडेशन, जिप प्राथमिक शिक्षण विभागाचे वतीने शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये प्राथमिक शाळांसाठी आमची शाळा आदर्श शाळा उपक्रम राबविण्यात आला. उपक्रमामध्ये गोंदिया जिल्ह्यातील सर्व 595 प्राथमिक शाळा सहभागी झाल्या. शाळांच्या मूल्यांकनासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली. यासाठी 100 गुणांची प्रश्नावली तयार करण्यात आली. ज्यात शालेय भौतिक सुविधेवर 17 गुण, लोकसहभागावर 9, विद्यार्थ्यांच्या योजनांवर 6, स्पर्धा परीक्षांवर 7, गुणवत्ता पूर्ण उपक्रमांवर 11 आणि शैक्षणिक गुणवत्तेवर 50 गुण. असे निवडीचे निकष होते. जिल्ह्यातील 85 केंद्र स्तरावरून प्रत्येकी 1 प्रमाणे 85 शाळांचे मूल्यांकन करण्यात आले. यानंतर प्रत्येक तालुक्यातील प्रत्येकी 2 प्रमाणे 16 शाळांचे मूल्यांकन करण्यात आले. या 16 शाळांमधून प्रथम आलेल्या 8 शाळांची निवड करण्यात आली. यातून जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक एकोडी प्राथमिक शाळेने, द्वितीय ब्राम्हणी शाळेने आणि संयुक्तरीत्या तृतीय क्रमांक उचेपूर व चोरखमारा शाळेने पटकावला.

अदानी फाउंडेशनची आर्थिक तरतूद

जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय विजेत्या शाळांना अनुक्रमे 1 लाख 21 हजार, 75 हजार आणि 51 हजार तर तालुकास्तरावरील प्रथम आणि द्वितीय शाळेला अनुक्रमे 51 हजार, 35 हजार आणि केंद्रस्तरावर प्रथम आलेला शाळेला 5000 रुपयाचे रोख पारितोषिक, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरस्काराची सर्व आर्थिक तरतूद अदानी फाउंडेशनच्या सीएसआर निधीतून करण्यात आली आहे.

पुरस्कार निधी या सुविधांवर होईल खर्च

शाळा व विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार पुरस्कार निधी खर्च करण्याला मुभा देण्यात आली आहे. यात विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ, भौतिक साहित्य खरेदी व इतर आवश्यक गोष्टींसाठी पुरस्कारातील निधी खर्च करण्याची मुभा विजेत्या शाळांना राहणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share