बाराविच्या विद्यार्थ्यांची आजपासून परीक्षा

गोंदिया: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी 12 वीची परीक्षा उद्या 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. जिल्हाभरातून 19 हजार 924 विद्यार्थ्यांची कसोटी लागणार आहे. कॉपीसह अन्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने भरारी पथकांची नेमणूक केली आहे. 19 मार्चपर्यंत चोख बंदोबस्तात परीक्षा होईल.

यासाठी सर्व त्या उपाययोजना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत. जिल्ह्यात 76 केंद्रांवरून विद्यार्थ्यांना परीक्ष देता येणार आहे. परीक्षा भय व कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी केंद्रनिहाय बैठे पथक नियुक्त आहेत. याशिवाय दोन विशेष भरारी पथके राहतील. एका पथकात जिल्हाधिकारी, जिप मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, डाएटचे प्राचार्य, माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी (योजना) यांच्यासह महिला अधिकारी तसेच दुसर्‍या पथकात तहसीलदार, गटविकास अधिकारी यांचा समावेश राहील. कॉपीबहाद्दर व केंद्रांवर होणार्‍या गैरप्रकारावर नियंत्रणासाठी इंग्रजी आणि गणिताच्या पेपरचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. अनुचित प्रकार घडू नये, विद्यार्थ्यांना शांततेत पेपर सोडविता यावे, यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. 100 मीटर अंतरात प्रवेशबंदीही आहे.

परीक्षा सुरळीत व्हाव्यात यासाठी शिक्षण विभागाने सूक्ष्म नियोजन केले आहे. शांततेत व कॉपीमुक्त वातावरणात परीक्ष पार पाडण्यासाठी प्रत्येक केंद्रात बैठे पथक राहणार आहेत. भरारी पथकांसह जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांचेही पथक केंद्रांना आकस्मिक भेटी देऊन पाहणी करणार असल्याचे माध्यमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगीतले.

Print Friendly, PDF & Email
Share