‘मुख्यमंत्री सुंदर शाळा’ अभियानात गोंदिया राज्यात अव्वल पण रिक्त पदे आणि गुणवत्ता विकासाचे काय?

⬛️178 शाळेत एक शिक्षक , देवरी तालुक्यात सर्वाधिक 46 शाळेत एकच शिक्षक

गोंदिया : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी राबविण्यात येत आहे. हे अभियान राबविण्यात राज्यात जिल्हा आजघडीला अव्वलस्थानी असल्याची माहिती आहे. परंतु शिक्षक रिक्त पदे आणि विद्यार्थी गुणवत्ता विकासाचे काय? असा प्रश्न ग्रामीण भागातील जिप च्या शाळा बघून ग्रामीण जनतेला पडलेला आहे.

एकीकडे गोंदिया जिल्हा परिषदेची शिक्षण विभागातील यंत्रणा ऑनलाइन कामांना प्रथम प्राधान्य देत जिल्हाची आकडेवारी वाढविण्यात व्यस्त झालेली असून ग्रामीण भागातील विद्यार्थी विकासाकडे चक्क दुर्लक्ष होत असल्याने पालकांना आपल्या पाल्याच्या शिक्षण आणि गुणवत्तेचा प्रश्न पडला आहे.

गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गट ‘ब’ व ‘ड’ ची तब्बल 985 पदे रिक्त आहे. ‘ब’ गटात माध्यमिक मुख्याध्यापकांची 13, माध्यमिक शिक्षकांची 26, उच्च माध्येमिक शिक्षकांची 32, शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी ‘2’ ची 3, श्रेणी ‘3’ ची 23, केंद्र प्रमुखांची 65 अशी 156 पदे रिक्त आहेत. तर गट ‘क’ मधील उच्च श्रेणी मुख्याध्यापकांची 153, पदवीधर शिक्षकांची 581, माध्यमिक शिक्षकांची 75, पुर्व माध्यमिक सहायक शिक्षकांची 10, प्रयोगशाळा सहयाकांची 8 अशी 829 पदे रिक्त आहेत. यातील काही पदे पदोन्नतीद्वारे तर उर्वरित पदे सरळसेवेने भरली जाणार आहेत. वरील आकडेवारी जून 2023 अखेरची आहे. यानंतर 150 पेक्षा अधिक पदे सेवानिवृत्तीने रिक्त झाली आहेत. तर 200 पेक्षा अधिक कर्मचार्‍यांनी सेवासमाप्ती पुर्व निवृत्तीसाठी अर्ज केल्याची माहिती आहे.

178 शाळा एकशिक्षकी

जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षकांची वानवा आहे. येथील जिल्हा परिषदेच्या तब्बल 178 शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी एकच शिक्षक आहे. गोंदिया तालुक्यातील 11 शाळा एकशिक्षकी आहेत, आमगाव 8, अर्जुनी मोरगाव 22, देवरी 46, गोरेगाव 16, सडक अर्जुनी 18, सालेकसा 32 आणि तिरोडा तालुक्यातील 25 शाळांमध्ये एकच शिक्षक अध्यापनाचे कार्य करीत आहे. एका शिक्षकावर चार वर्गांची जबाबदारी असल्याने सर्व विद्यार्थ्यांना एकत्र शिकवणे शिक्षकांसाठी आव्हानात्मक ठरत आहे.

जिल्हात स्वेच्छा निवृत्ती घेणार्‍या शिक्षकांची संख्या वाढली

दिवसेंदिवस कार्यरत शिक्षकांवरील कामाचा ताण वाढतच आहे. शिक्षणाचा खालावलेला दर्जा, शैक्षणिक धोरण आणि गैरशैक्षणिक कामांचीही भरमार आहे. भरतीचे प्रमाण कमी आणि सेवानिवृत्तीचे प्रमाण जास्त असल्याने गुरुजींचा ताप वाढतच चालला आहे. येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात दरवर्षी 200 पेक्षा अधिक शिक्षक सेवानिवृत्त होत आहेत. मागील 10 वर्षात शिक्षक भरती झाली नाही. गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 1038 शाळा आहेत. या शाळांमध्ये 43 हजार 835 मुले व 43001 मुली अशी 86 हजार 836 विद्यार्थीसंख्या आहे. प्राप्त माहितीनुसार गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक अशी 900 पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत.

Share