पक्षीगणनेत अनेक विदेशी पाहुण्यांची नोंद
गोंदिया⬛️ वन्यजीवांच्या बचावाकरिता सेवा संस्थेच्या वतीने जिल्ह्यात गत आठ वर्षांपासून सातत्याने काम करण्यात येत आहे. जिल्ह्यातील तलाव व पानथळ क्षेत्रावर नुकतीच आशियाई पक्षीगणना करण्यात आली. त्यात विविध विदेश पक्षांची नोंद करण्यात आली. गोंदिया हा तलावांचा जिल्हा आहे. तलाव, पानथळ क्षेत्रात विविध प्रजातींचे स्थलांतरीत तसेच स्थानिक पक्षी हिवाळ्यात मुक्कामी असतात. सेवा संस्था व वनविभागाच्या वतीने दरवर्षी पानथळ क्षेत्रात येणार्या स्थलांतरीत व स्थानिक पक्षांची गणना करण्यात येते. यावर्षीही नुकतीच जिल्ह्यातील परसवाडा, झिलमिली, शिवनी, छिपीया आदी तलावावर ही गणना करण्यात आली.
उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई, सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार यांच्या मार्गदर्शनात मड ऑन बुट्स प्रोजेक्ट लिटर तसेच सेवा सदस्य कन्हय्या उदापुरे, सशांत लाडेकर, सहायक वनसंरक्षक योगेंद्रसिंग, वनपरिक्षेत्राधिकारी दिलीप कौशिक यांच्या उपस्थितीत पक्षीगणना करण्यात आली. यावेळी स्वयंसेवी, पक्षी निरीक्षक, पक्षी मित्र, सारस मित्र आदींनी ही गणना पूर्ण केली. या गणनेत ग्रे लेग गुज, नार्दर शोवेलर, कॉमन पोचार्ड, नाद्रह पिटेल, नोव बिल डक, युरसियन विजन, गडवाल, गार्गनी, रेड क्रेस्टेड पोचार्ड, फेरुजिनिअस डक, टफटेड डक, कॉमन टिल आदी विदेशी पक्षांची नोंद करण्यात करण्यात आली. या गणनेत सेवा संस्थेचे अंकीत ठाकूर, पुजा मोरघरे, प्रतिक लाडेकर, भास्कर कापसे, पारितोष सूर्यवंशी, ॠषभ महारवाडे, सानिध्य गजभिये, निशांत कुर्वे तसेच धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला.
स्थलांतर करणारे पक्षी, त्यांचे विचरण, स्थिती व त्यांच्या सर्वसाधारण कल काय आहे, यासंबंधित माहिती संकलित करण्यासाठी गणना करण्यात येते. दरवर्षी हा उपक्रम देशभरात स्वयंसेवी संस्था, पक्षीमित्र व वनविभागाच्या वतीने राबविला जातो.
सावन बहेकार, अध्यक्ष, सेवा संस्था