जिल्ह्यात दुग्ध उत्पादनात 20 टक्क्याने वाढ

गोंदिया: बदलत्या वातावरणामुळे पारंपारीक शेती दिवसेंदिवस नुकसानीचे ठरत आहे. शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय करण्याची गरज आहे. 2011-12 पासून आतापर्यंत जिल्ह्यातील 306 गावांना कामधेनू ग्राम दत्तक योजनेतंर्गत दत्तक घेऊन दुग्ध उत्पादनात 20 टक्के वाढ झाल्याचे चित्र आहे.

गावांमध्ये दूध उत्पादनात वाढ व्हावी, पशुपालकाना तांत्रिक जोड देऊन लसीकरणापासून जनावरे संवर्धनापर्यंतची जबाबदारी सांभाळण्याची किमया पशुसंवर्धन विभागाकडून कामधेनू दत्तक गावांत करण्यात येत आहे. जिल्ह्यात या योजनेमुळे त्या गावात पूर्वीच्या तुलनेत दूध उत्पादनात 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2011-12 पासून ही योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसवंर्धन विभागाद्वारे 300 पैदास योग्य पशू असणार्‍या गावांत पशुगणना करुन त्या गावांची कामधेनू दत्तक ग्राम म्हणून निवड करण्यात आली.

ज्या गावाला दत्तक घेतले, त्या गावातील सर्व जनावरांचे लसीकरण, दुग्ध उत्पादन किती आहे, दूध उत्पादन वाढविण्यासाठी काय करता येईल, जनावरांची औषधे, खनिजद्रव्ये, जंतनाशक औषधी, गोचिड निर्मुलन, शेतकरी सहल आदीसह संकरीत वासरांचा मेळावा घेऊन बक्षीस देणे, वैरण विकासासाठी प्रयत्न करणे, जनावरांच्या विस्तारासाठी कार्यक्रम घेणे, खताचे व्यवस्थापन या गावांत करण्यात येत आहे. ज्या गावाला दत्तक घेतले त्या गावाला वर्षाकाठी 1 लाख 52 हजार रुपये जनावरे संवर्धनासाठी देण्यात येते. गावातील सर्वाधिक पशुमालकाची पशुमालक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड केली जाते. तसेच गावातील शेतकरी व पशुमालकांना मार्गदर्शन करण्यासाठी अधिकारी एक दिवस मुक्काम करतात.

कामधेनू दत्तक गावात वेळोवेळी मार्गदर्शन करुन तेथील दुध उत्पादनावर लक्ष केंद्रीत केल्यामुळे जिल्ह्यात कामधेनू दत्त गावांमध्ये 20 टक्क्यांनी दुधाचे उत्पादन वाढले आहे. त्या गावातील पशुंची देखरेख व मार्गदर्शन करण्यासाठी एक दिवस दत्तक गावात मुक्काम केला जात असल्याचे जिपचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कांतीलाल पटले यांनी सांगितले.

Print Friendly, PDF & Email
Share