जिल्ह्यातील सहा तालुक्यात मेगा वॉटरशेड प्रोजेक्ट

गोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ‘हाय ईम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रोजेक्ट’ची गोंदिया जिल्ह्यातही अंमलबजावणी होणार आहे. यातंर्गत जिल्ह्यातील 6 तालुक्यांमध्ये पुढील पाच वर्षात हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ‘हाय ईम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रोजेक्ट’ च्या अंमलबजावणीकरीता जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय सभा घेण्यात आली.

सभेला उपजिल्हाधिकारी (रोहयो) चंद्रभान खंडाईत, प्रकल्पाचे क्षेत्रीय समन्वयक नितेश बोपचे, समता निर्माण विशेतज्ञ अरविंद उईके, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.कांतीलाल पटले, सहायक जिल्हा माहिती अधिकारी कैलाश गजभिये यांची उपस्थित होते. या प्रकल्पाच्या अनुषंगाने मग्रारोहयोअंतर्गत अ‍ॅक्सीस बँक फाऊंडेशन, भारत रुरल लाइव्हलीवुड फाऊंडेशन आणि मनरेगा यांच्यात सामंजस्य करार झाला असून गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, देवरी, सडक अर्जुनी आणि सालेकसा, अर्जुनी मोरगाव, तिरोडा अशा एकूण 6 तालुक्यांमध्ये ‘हाय ईम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रोजेक्ट’ पुढील पाच वर्षापर्यंत राबविण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

महाराष्ट्रातील सुमारे एक लाख कुटूंबांचे उत्पन्न दुप्पट करणे तसेच 1.77 लक्ष हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणणे ही या उपक्रमाची प्रमुख उद्दिष्ट आहेत. राज्यातील 26 तालुक्यांमधील 878 मायक्रो वॉटरशेड यासाठी विकसित केली जाणार आहेत. ‘आजची मजुरी ही उद्याची समृध्दी आहे’ असे या प्रकल्पाचे घोषवाक्य आहे. अशी माहिती ‘हाय ईम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रोजेक्ट’चे क्षेत्रीय समन्वयक नितेश बोपचे यांनी दिली.

Print Friendly, PDF & Email
Share