गोंदियात मानसिक(Mental) रुग्णांची संख्येत कमालीची वाढ

5 महिन्यांत 20 हजार रुग्णांची नोंद

गोंदिया◼️ दिवसेंदिवस आत्महत्या तसंच मानसिक आजाराचं प्रमाण वाढत आहे. 21 व्या शतकातला सर्वांत मोठा आजार म्हणून मानसिक आजार असल्याचं अनेक जाणकार आणि तज्ज्ञ सांगताहेत. अशातच गोंदिया जिल्ह्यात दिवसेंदिवस मानसिक आजारांच्या रुग्णांत वाढ होत आहे. शासकीय आरोग्य संस्थेच्या नोंदीनुसार जिल्ह्यात गत 5 महिन्यांत 20 हजार रुग्णांची नोंद झाली आहे.

तणाव, अस्वस्थता, चिंता, भयगंड, स्किझोफ्रेनिया यांसारख्या विविध मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. कोरोना साथीनंतर मानसिक आजारांच्या रुग्णांमध्ये अधिक भर पडली असल्याचे तज्ञ सांगतात. दर दहापैकी पाच ते सहा जण मानसिक आजारांचे शिकार होत आहेत. याबाबत जागरूकता निर्माण करताना वेळीच या आजारावर उपचार करुन घेण्याची आवश्यकता मानसोपचार तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. गोंदिया जिल्ह्यात आर्गेनिक मेंटल डिसिज, दारूमुळे मानसिक रोगी होणे, स्मृतिभ‘ंश, भीती वाटणे, दूधवीय आजार, स्किझोफ्रेनिया, उदासीनता, व्यसनाधीनता, अकस्मार (मिरगी), गतिमंद, निद्रानाश व इतर अनेक प्रकारचे मानसिक आजार लोकांना होताना दिसत आहेत. यंदा एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत तब्बल 20 हजार 281 जण मानसिक रुग्ण असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. कोरोनापासून ही आकडेवारी झपाट्याने वाढत आहे. ही शासकीय आकडेवारी असून यापेक्षा चार पटीने मानसिक रोगी जिल्ह्यात असल्याचे बोलले जाते. जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने 2061 रुग्णांवर उपचार केले. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयाने 465 रुग्णांवर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयपीडीमध्ये 326, रुग्ण तर जिल्ह्यातील 40 प्राथमिक आरोग्य केंद्रांतून 17 हजार 429 जणांवर मानसिक आजाराचे उपचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीत नमूद आहे.

गत वर्षी शासकीय रुग्णालयांमध्ये 400 ते 450 रुग्ण दर महिन्याला यायचे. यंदा मात्र हा आकडा 550 ते 600 वर गेला आहे. यापैकी 20 ते 25 टक्केच रुग्ण मानसिक आजाराने ग‘स्त असतात. बहुतांश वेळा याकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे सौम्य स्वरूपाच्या मानसिक आजारांचे रूपांतर गंभीर आजारांमध्ये होत असल्याचे निरीक्षण असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी सांगीतले.

कोरोनानंतर मानसिक आजारांमध्ये लक्षणीय वाढ झालेली असून, यासंदर्भात आणखी जागरूकता वाढली पाहिजे. बहुतांश मानसिक आजार योग्य उपचारातून पूर्णपणे बरे हाऊ शकतात. सौम्य ते गंभीर स्वरूपाच्या आजारांवर वेळीच व पूर्ण उपचार घेऊन सामान्य जीवन जगता येऊ शकते.

डॉ. स्नेहा शर्मा, मानसोपचार तज्ञ, जिल्हा सामान्य रुग्णालय

Print Friendly, PDF & Email
Share