ग्रामसेवकांच्या अधिवेशनात आदर्श ग्रामसेवकांचा सत्कार
गोंदिया ◼️ महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे वार्षिक अधिवेशन व गोंदिया जिल्हा ग्राम विकास अधिकारी ग्रामसेवक पतसंस्थेची आमसभा अध्यक्ष कमलेश बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली मयूर लॉनमध्ये पार पडली. यावेळी आदर्श ग्रामसेवकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सभेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद खामकर, गटविकास अधिकारी आ. पो. पिंगळे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रसंगी मुकाअ अनिल पाटील यांनी, काळ परिस्थितीनुसार स्वतःत बदल करून अधिक पारदर्शक व डिजिटल स्मार्ट वर्क करण्याची गरज असून लोकाभिमुख काम करण्याचे निर्देश दिले. गोविंद खामकर यांनी, नविन आवाहन व त्यावर उपायाबद्दल मार्गदर्शन केले. ओ. पी. पिंगळे यांनी, कामादरम्यान शिस्त व पारिवारिक एकोपा ठेऊन प्रशासकीय कामे सहज सुलभ करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. दरम्यान जिल्ह्यातील आठही तालुक्यातील आदर्श ग्रामसेवकांचा, पदोन्नती झालेले कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचार्यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेवर ग्रामसेवक संवर्गातून निवडून आलेल्या पदाधिकारी व संचालकांचा सत्कार करण्यात आला. आमसभेत अनेक धोरणात्मक निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आले. संचालन कुलदीप कापगते यांनी केले. प्रास्ताविक कमलेश बिसेन यांनी केले. आभार शैलेश परिहार यांनी मानले.