गोंदिया-देवरी-गोंदिया बसफेरी पूर्ववत करा

गोंदिया ◼️जिल्ह्यातील देवरी या दुर्गम, संवेदनशील, नक्षलग्रस्त भागात येथील राज्य मार्ग परिवहन महामार्गाच्या आगारातर्फे चालविण्यात येणारी गोंदिया-देवरी-गोंदिया ही सकाळ व सायंकाळ पाळीतील बसफेरी पूर्ववत सुरू करण्यात यावी, या मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांनी आज 11 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

गोंदिया येथून सकाळी व सायंकाळी सुटणारी देवरी बसफेरी दोन महिन्यांपासून बंद आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी, मजूर, शेतकरी, छोटे व्यवसायिक व सर्व सामान्य प्रवाशांना अडचणीचे होत आहे. या मार्गावर यावेळी प्रवाशाची साधने नसल्याने अनेकदा विद्यार्थी विद्यार्थिनींची शाळा सुटते किंवा शाळेत जायला उशीर होतो. त्यामुळे देवरी मार्गावर चालणारी गोंदिया-देवरी तसेच मानव विकास कार्यक्रम अंतर्गत चालणारी बसफेरी पूर्ववत सुरू करावी, या मागणीसह देवरी तालुक्यातील चिंचगड, ककोडी व सालेकसा तालुक्यातील दर्रेकसा या परिसरात मोबाईल नेटवर्कची समस्या असल्याने या वरील गावांमध्ये दूरसंचार मनोरे लावण्याचीही मागणी पुराम यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Share