भंडारा: वाघमारेच निघाला मृत ‘वाघा’चा मारेकरी
भंडारा◼️शेतशिवारात येणा-या वन्यप्राण्यांना अटकाव करण्यासाठी लावण्यात आलेल्या विजेच्या तारेच्या सापळ्यात अडकून वाघाचा मृत्यू झाला. भितीपोटी आपण त्याला शेतातच झाडाच्या फांद्यांनी झाकून ठेवल्याने तो कुजल्याची कबुली दिल्याने याप्रकरणी शेतकरी रतनलाल वाघमारे याला वनविभागाने ताब्यात घेतले आहे. तुमसर वनपरिक्षेत्रांतर्गत खंदाड येथील रतनलाल वाघमारे यांच्या शेतात 16 ऑगस्ट रोजी कुजलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह आढळला होता.
शेतशिवारात रानडुकरांचा धुमाकूळ असल्याने शेतकरी रतनलाल वाघमारे याने त्याच्या शेतात विद्युत तारा टाकून सापळा रचला. मात्र या परिसरात वाघाचा संचार असतो. अनेकदा शेतात वाघाचे दर्शनही झाले आहे. त्यामुळे 9 ऑगस्ट रोजी वाघ या शेतशिवारात वावरत असताना वाघमारे यांनी लावलेल्या सापळ्यात तो अडकला आणि तीव्र विद्युत धक्क्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. रानडूक्कर सापळ्यात अडकला असावा म्हणून वाघमारे यांनी जाऊन पाहिले असता त्यांना तेथे वाघ दिसला. मृतावस्थेत वाघाला बघून त्याची घाबरगुंडी उडाली व कारवाईच्या भीतीपोटी त्याने वाघाचा मृतदेह झाडाच्या फांद्या व पालापाचोळात झाकून ठेवला. दरम्यान मृतदेह कुजल्याने दुर्गंधी सुटली. 16 रोजी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास पोलिस पाटील कमलेश भारद्वाज यांना धानाच्या एका शेतामध्ये झाडांच्या फांद्यांनी झाकून ठेवलेला वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसताच त्यांनी वन विभागाला याबाबत माहिती दिली.
चौकशी दरम्यान शेतमालक रतनलाल वाघमारे यांच्या घरी वन विभागाने तपासणी केली असता विजेचे वायर आणि काठया आढळल्या. यावरून त्या वाघाचा मृत्यू विजेच्या सापळ्यात अडकूनच झाल्याचा प्राथमिक अंदाज वन विभाग आणि पोलिसांनी व्यक्त केला. या शेतक-याला ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांनी लावलेल्या सापळ्यात वाघ अडकून मेल्याचे कबूल केले. या प्रकरणी शेत मालक वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.