मधमाशांच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू, पाच जखमी

गोंदिया ◼️ शेतात काम करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांवर मधमाशांनी अचानक हल्ला केला. या घटनेत एका शेतमजूर महिला व शेतमालक सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू झाला. ५ शेतमजूर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवार, ३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ४ वाजताच्या सुमारास गोरेगाव तालुक्यातील कुऱ्हाडी शेतशिवारात उघडकीस आली.

सुमन आनंदराव आमडे व लक्ष्मीचंद पुरनलाल पटले (६५) असे मृतांचे नाव आहेत. अंकित लक्ष्मीचंद पटले (२७), ग्यानीराम उईके (५७), माया आमडे (४२), मंदा आमडे (४२), प्रमिला चौधरी (३०) असे जखमींची नावे आहेत. सर्व कुऱ्हाडीचे रहिवासी आहेत. मधमाशांच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे याआधीही कुऱ्हाडी येथील शिक्षक श्रावण कुंभारे यांचाही मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.

Print Friendly, PDF & Email
Share