सालेकसा🚨बसस्थानकाअभावी चार दशकांपासून प्रवासी रस्त्यावरच…!
◼️ऊन पावसात उभे राहून थांबावे लागते बसच्या प्रतीक्षेत, महिला प्रवाशांची मोठी गैरसोय
सालेकसा ◼️महाराष्ट्र राज्यातील गोंदिया जिल्ह्याच्या पूर्व टोकाला मध्यप्रदेश व छत्तीसगढ राज्यांच्या सीमेवर असलेल्या सालेकसा तालुक्याचा दर्जा मिळाल्यापासून ४१ वर्ष लोटले मात्र बसस्थानका अभावी जिल्ह्यातून, राज्यातून येणे जाणे करणाऱ्या प्रवाशांना सालेकसा येथे आल्यावर बसच्या प्रतीक्षेत ऊन, पावसात भर रस्त्यावरच ताटकळत उभे राहावे लागते. विशेष म्हणजे, महिला प्रवाशांची मोठी गैरसोय होते. सालेकसा तालुका हा आदिवासी बहुल संवेदनशील, नक्षलग्रस्त, जंगलव्याप्त, अतिदुर्गम भागात मोडत असलेल्या या तालुक्यात गरीब आदिवासी शेतकरी आणि शेतमजूर लोकांचे वास्तव्य अधिक आहे. लोकांना प्रवास करण्यासाठी एसटीवर जास्त अवलंबून राहावे लागते. सालेकसा तालुक्याची स्थापना १९८२ मध्ये झाली.
जिल्हा मुख्यालयापासून ४५ किमी अंतरावर पूर्व टोकावर असलेल्या या तालुका मुख्यालयात एक नगर पंचायत आणि एकूण ४१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तालुक्यात सुमारे ९२ गावे आहेत. गावांसह १३० वाड्या वस्त्या आहेत. तालुक्याची लोकसंख्या सुमारे एक लाख दहा हजार आहे. निम्म्या लोकसंख्येचा मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यांशी सातत्याने संबंध येतो. सालेकसा तालुका महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्यप्रदेश राज्याच्या सीमेला लागून आहे. या राज्यातील नागरिकही या तालुक्यातून ये-जा करतात.