अंगणवाडी पद भरती प्रलोभनाला बळी पडू नका! -सविता पुराम

प्रहार टाईम्स
गोंदिया ◼️जिल्ह्यात आंगणवाडी पदभरती होत असून या आंगणवाड्यांमध्ये नियुक्तीसाठी काही दलाल, एजंट सक्रिय झाले आहेत. ते उमेदवारांना आर्थिक प्रलोभन देऊन नियुक्तीचे आश्वासन देत आहेत, ही भरती पूर्णतः गुणवत्तेनुसार व पारदर्शक होणार आहे, करिता उमेदवारांनी अशा प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांनी केले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील 9 प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांची 273 पदे भरली जात आहेत. यासाठी संबंधित विभागाकडून जाहिरात काढण्यात आली आहे. पदभरती संदर्भात काही दलाल, एजंट सक्रिय झाले आहेत. त्यांच्याकडून उमेदवारांना आर्थिक प्रलोभन देऊन नोकरीची हमी दिली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. भरती प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक आणि उमेदवारांच्या उच्चतम गुणवत्तेच्या आधारावर होणार आहे. पदभरतीसाठी किमान अहर्ता 12 वी उत्तीर्ण असली तरी यासाठी उत्तम अहर्ता ग्राह्य धरण्यात येणार आहे. यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. समिती उमेदवारांची उच्चतम गुणवत्ताच्या आधारावर निवड करणार आहे. बारावीत 80 टक्के पेक्षा अधिक गुण असल्यास 60 गुण, 70 ते 80 टक्क्यास 55 गुण, 60 ते 70 टक्के असल्यास 50 गुण, 50 ते 60 टक्के असल्यास 45 गुण, 50 ते 40 टक्के गुण असल्यास 40 गुण व यापेक्षा कमी गुण असल्यास 35 गुण दिले जाणार आहे. पदवीत 80 टक्के पेक्षा अधिक गुण असल्यास 5 गुण, 70 ते 80 टक्के 4 गुण, 60 ते 70 टक्के 3 गुण, 50 ते 60 टक्के 2 गुण, 40 ते 50 टक्के 1 गुण, पदव्युत्तरसाठी 4 गुण, डीएड व डीएड असल्यास प्रत्येकी 2 गुण, एमएससीआयटी संगणक प्रमाणपत्र असल्यास 2 गुण, उमेदवार विधवा किंवा अनाथ असल्यास 10 गुण, एसटी, एससी 10 गुण, ओबीसी, एनटी, व्हीजेटी, एसबीसी, ईडब्लूएस असल्यास 5 गुण आणि अंगणवाडी सेविका, मदतनीस कामाचा अनुभव असल्यास 5 गुण या आधारावर उमेदवारांची गुणवत्ता निश्चित करून उच्चतम गुणवत्ताधारकांना अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकापदी नियुक्ती देण्यात येणार आहे. काही एजंट, दलाल आपले नाव समोर करून उमेदवारांना आर्थिक प्रलोभन देत आहेत करिता उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांनी केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share