नागपूर बसस्थानकात गोंदिया- भंडारा जिल्हाच्या प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्मच नाही! विभागाची सावत्र भूमिका
◼️गणेशपेठ स्थानकात केवळ २० प्लॅटफॉर्म आहे. मात्र, त्यात भंडारा, देवरी, गोंदिया मार्गाचा समावेश नाही.
Gondia : गणेशपेठ बसस्थानक येथून विदर्भासह राज्यभरातील बसगाड्या धावतात. मात्र, या स्थानकावर भंडारा व त्यापुढे जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्मच उपलब्ध असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.त्यामुळे प्रवाशांना मोकळ्या जागेवरच बसची वाट पाहात उभे राहावे लागते.
उन्हाळ्यात उन्हाचे चटके तर पावसाळ्यात पावसाचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे भंडाराकडील प्रवाशांवर अन्याय होत असल्याची भावना आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) नागपूर विभागात गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकावरून हजारो प्रवाशांची व वाहनाची रोज ये-जा असते
भंडारा विभागाची जवळपास ९० टक्के वाहतूक नागपूर-भंडारा मार्गावर आहे तर नागपूर विभागाची जवळपास ब ५० टक्के वाहतूक या मार्गावर आहे. या मार्गावरून भंडारा व गोंदिया आणि पुढे मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यापर्यंत बसच्या फेऱ्या चालविल्या जातात.
त्यामुळे प्रवाशांची गर्दी असते. नागपूर व भंडारा विभागाचे सर्वाधिक उत्पन्न महामंडळाला या मार्गावर मिळते. तरीही गणेशपेठ स्थानकावर भंडारा गोंदिया व त्यापुढील प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध नाही. प्लॅटफॉर्म तर सोडा साधा शेड सुद्धा स्थानकावर बांधण्यात आलेला नाही.
मोकळ्या जागेवर बसेस उभ्या राहतात. सध्या उन्हाळा सुरू असल्याने रखरखत्या भर उन्हात प्रवासी बसची वाट पाहात उभे असतात. पावसाळ्यात छत्री घेऊन उभे राहण्याशिवाय पर्याय नाही. तिन्ही ऋतूत भंडाराकडील प्रवाशांची अशीच स्थिती असते.
भंडारा मार्गासाठी फलाटाचे काम होणार होते. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे कंत्राटदाराला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात आले. त्यामुळे काम थांबले. तात्पुरती व्यवस्था म्हणून टेंट उभा करण्यात आला होता. मात्र, वादळी पावसामुळे उखडून गेला. प्रवाशांची गैरसोय पाहता लवकरच फलाटाची व्यवस्था करण्यात येईल.
प्रल्हाद घुले, विभागीय नियंत्रक- एसटी महामंडळ
गणेशपेठ स्थानकावर प्लॅटफॉर्म नसल्यामुळे भंडारा मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. रखरखत्या उन्हात प्रवासी उभे राहतातमहामंडळाला पत्र पाठवूनही अद्याप दखल घेण्यात आली नाही.
– नरेशकुमार जैन, सदस्य- प्रवासी संघटना (राज्य परिवहन)
प्रवासी संघटनेच्या पत्राकडे दुर्लक्ष:
■ प्लॅटफॉर्मच्या समस्येबाबत राज्य परिवहन गोंदिया आगार प्रवासी संघटनेचे सदस्य नरेशकुमार जैन यांनी मुंबई येथील महामंडळाचे उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक, उपमहाव्यवस्थापक नियंत्रण समिती क्र. ३ व विभाग नियंत्रक नागपूर आणि भंडारा यांना पत्र लिहून या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले होतेमात्र त्यावर काहीच कारवाई नंतर झाली नाही.