108 रुग्णवाहिका ठरली 1.63 लाख रुग्णांसाठी जीवनदायिनी
गोदिया ◼️ आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा जलद मिळावी, यासाठी जिल्ह्यासाठी आरोग्य विभागाने मार्च 2014 पासून सुरू केलेल्या 108 या आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेचा तब्बल 1 लाख 62 हजार 824 रुग्णांनी लाभ घेतल्याचे पुढे आले आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने मार्च 2014 पासून जिल्ह्यात 108 ही आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा सुरु झाली. आतापर्यंत 1 लाख 62 हजार 824 रुग्णांनी लाभ घेण्यात आला आहे. ही सेवा पुर्णतः मोफत आहे. या सेवेमुळे अपघातग्रस्त, बाळंतपणासाठी अडलेल्या महिला, विषबाधेसह इतर सर्वच प्रकारची वैद्यकीय मदत नागरिकांना वेळेत पोहोचू शकल्याने अनेकांना नवजीवन देण्याचे काम या वाहिकेमुळे साध्य झाले आहे. 108 क्रमांकावर कॉल केल्यास अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सज्ज असलेली रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेसाठी काही क्षणातच हजर होते. वाहिकेतील यंत्रांच्या सहाय्याने गोल्डन अवर्समध्ये रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी आवश्यक उपचार मिळतात. त्यामुळे घटनास्थळापासून रुग्णालयापर्यंत रुग्णांना स्वस्थता लाभत आहे. ‘जीपीआरएस’ प्रणालीमुळे कॉल आल्यास संबंधित डॉक्टरांना कळवून वाहिका घटनास्थळी दाखल होते.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने जिल्ह्यात 15 रुग्णवाहिका कार्यरत आहेत. सकाळ आणि रात्र सत्रांत वाहनचालक व वैद्यकीय अधिकारी त्यासाठी आरोग्य सेवा देत आहेत. रुग्णांसाठी ही सेवा मोफत आहे. वैद्यकीय तातडीच्या वेळी 108 क्रमांक डायल करून रुग्णवाहिकेची मदत घेता येते. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालय अशा वेगवेगळ्या ठिकाणी या रुग्णवाहिका उपलब्ध आहेत.