आरटीई मोफत प्रवेशासाठी आता अखेरची संधी : २२ मे पर्यंत मिळाली अंतिम मुदतवाढ

Gondia : आरटीई २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या प्रवेशाकरिता अंतिम मुदतवाढ देण्यात आली असून येत्या २२ मे पर्यंत प्रवेश घेण्याची अखेरची संधी असणार आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार सन २०२३-२४ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत ५ एप्रिल रोजी जाहीर झालेल्या ऑनलाइन सोडतमध्ये निवड यादीतील बालकांचे प्रवेश १३ एप्रिलपासून सुरु झाले. निवड समितीकडे जावून प्रवेश घेण्यासाठी सुरुवातीला २५ एप्रिल मुदत होती. त्यानंतर ८ मे आणि पुन्हा १५ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

सदर प्रकरणी कागदपत्रांची तपासणी करणे व प्रवेश निश्चितीकरिता २२ मे पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली असून त्याबाबतचे आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शुक्रवारी १२ सायंकाळी उशिरा काढले आहेत. सदर वाढीव मुदतीच्या कालावधीतील दाखले (कागदपत्रे) ग्राह्य धरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, वाशिम जिल्ह्यात शनिवार १३ मे १२ वाजेपर्यंत निवड झालेल्या ७७५ पैकी ४८७ बालकांचे प्रवेश निश्चित झाले होते.

२२ मे नंतर प्रतीक्षा यादीतील बालकांचे प्रवेश
आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेंतर्गत ऑनलाइन सोडतीद्वारे निवड झालेल्या प्रतीक्षा यादीतील बालकांची प्रवेश प्रक्रिया २२ मे नंतर सुरु करण्यात येणार आहे. निवड यादीतील प्रवेश प्रक्रिया संपताच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे मेसेज पाठविले जाणार आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रतीक्षा यादीतील नंबरची खात्री करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share