गोंदिया : ४ महिन्यात ४८ लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू , जिल्हात ८ ब्लॅकस्पॉट
◼️जानेवारी ते एप्रिल 2023 अपघात 80 मृत्यू 48 गंभीर 56
गोंदिया◼️ जिल्ह्यात गत सव्वापाच वर्षात झालेल्या विविध वाहन अपघातात 833 जणांचा बळी गेला तर तब्बल 882 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. सुसाट वेगाने वाहन चालविणे, नियमांचे उल्लंघन करणे, मोबाईलवर बोलणे ही अपघाताची कारणे सांगितले जातात. जिल्ह्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गासह विविध राज्य आणि जिल्हा मार्गावर दररोज कुठे ना कुठे अपघात घडत आहेत.
वाढत्या शहरीकरणासह रस्त्यांवर धावणार्या वाहनांची संख्याही वाढल्याने जीव गुदमरू लागला आहे. माणसांना मोकळा श्वास घेणे तर लांबच, वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनांची देखील जणू रस्सीखेच सुरू असल्याचे दिसते, अन् यातूनच सुरू होते अपघाताची मालिका मागील सव्वापाच वर्षांत झालेल्या 1360 अपघातांमध्ये तब्बल 833 जणांनी प्राण गमावले, 882 जण गंभीर तर 574 जण किरकोळ जखमी झाले. यातील काहींना कायमचे अपंगत्व आल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील आठ ठिकाणे यमदूत मार्ग (ब्लॅकस्पॉट) म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत.
वेगाची नशा, विना हेल्मेट प्रवास, सिग्रल न पाळणे, नियमांचे पालन न करता बेदरकारपणे वाहन चालवणे अपघाताचे कारण ठरून अनेकांच्या जिवावर बेतत असल्याने रस्तोरस्ती मृत्यूचे सापळेच झाल्याचे पाहायला मिळत आहे. दिवसाला अपघाताच्या एक-दोन घटना आणि अपघातात रोज एकाला जीव गमवावा लागत आहे. विना खबरदारीने वाहन चालविणे जणू आता काळच बनले आहे. त्यामुळे ‘वाहन चालवताय, जरा सावधान!’ असेच म्हणण्याची सध्या वेळ आली आहे. वाहतूक विभागाकडून वारंवार आवाहन करूनही सर्रास मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणे, हेल्मेट न वापरताच प्रवास करणे, मद्यपान करून वाहन चालविणे आदी अनेक बाबी अपघातास कारणीभूत ठरताहेत.
ब्लॅकस्पॉट अपघात प्रवास स्थळे
जिल्ह्यातील काही ठिकाणे ही अपघातप्रवण स्थळे बनली आहेत. यात डुग्गीपार पोलिस स्टेशन अंतर्गत नयनपूर, देवरी पोलिस स्टेशन हद्दीतील मासुलकसा, तिरोडा पोलिस स्टेशन अंतर्गत मुंडीकोटा, सहकार नगर, सालेकसा पोलिस स्टेशन अंतर्गत गॅस गोदाम, रामनगर पोलिस स्टेशन हद्दीतील भागवतटोला शिवार, कटंगीकला शिवार आणि अर्जुनी मोर पोलिस स्टेशन अंतर्गत कुंभीटोला/बाराभाटी डांबर प्लांट ही आठ स्थळे ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखली जातात. या ठिकाणी सन 2019 ते सन 2021 या काळात 62 अपघात 42 जणांचा बळी गेला आहे.
वाहन चालवताना हे करा…
दुचाकीवर प्रवास करताना हेल्मेटचा वापर करा, दुचाकीवर मागे बसणार्याने हेल्मेट परिधान करावे, वेगावर नियंत्रण ठेवा, वाहतुकीचे नियम पाळा, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे टाळा, सिग्रलला सकारात्मक प्रतिसाद द्या, लेन कट, राँग साईड वाहन चालवू नका. वेळ व जीवन अमूल्य आहे. आपल्या जीवासह इतरांच्याही जीवाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने मोटार वाहन नियमांचे काटेकोर पालन केल्यास अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल, असे जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक जयेश भांडारकर यांनी सांगितले.