गोंदिया जिल्हात १.५ लक्ष विद्यार्थ्यांना मिळणार पाठ्यपुस्तके

गोंदिया : समग्र शिक्षा अभियानातंर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने शैक्षणिक सत्र 2023-24 वर्षाकरिता इयत्ता पहिली ते आठवीच्या 1 लाख 30 हजार 180 विद्यार्थ्यांना यंदा 1 लाख 33 हजार 960 मोफत पाठ्यपुस्तके देण्याचे नियोजन करण्यात आले असून जिल्हा परिषदेने बालभारतीकडे पुस्तकांची मागणी नोंदविली आहे.

यंदा उन्हाळी सुटीनंतर शाळा 27 जून रोजी उघडणार आहे. समग्र शिक्ष अभियानातंर्गत शासकीय शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे (Textbooks) वाटप दरवर्षी करण्यात येते. यानुसार जिल्ह्यातील 1 लाख 30 हजार 180 विद्यार्थ्यांना पुस्तके मिळावीत, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने राज्य सरकारच्या बालभारती विभागाकडे केली आहे.

मागणी केलेली पुस्तके शिक्षण विभागाला उपलब्ध झाल्यावर ही पुस्तके तालुकास्तरावरील गटशिक्षणाधिकार्‍याकडे देण्यात देण्यात येतील. तेथून केंद्रप्रमुख तसेच मुख्याध्यापकांकडे पुस्तके पोहोचविण्यात येणार आहे. विद्यार्यिांना सर्व पुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनील पाटील व शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली याचे नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात 1 लाख 33 हजार 860 पुस्तकांची मागणी नोंदविण्यात आली आहे. पुस्तके या महिन्याच्या शेवटपर्यंत जिल्ह्यात पोहोचण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Print Friendly, PDF & Email
Share