रानटी हत्ती जिल्हात कम बॅक

गडचिरोली◼️गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्र -छत्तीसगड राज्याच्या समीमावर्ती भागात वावर असलेल्या रानटी हत्तींनी आठवडाळारापूर्वी छत्तीसगड राज्यात काढता पाय घेतला होता, परंतु १४ एप्रिल रोजी ८ ते १0 संख्येत असलेल्या रानटी हत्तींच्या कळपाने पुन्हा छत्तीसगड राज्यातून धानोरा तालुक्यातील मुरूमगाव पूर्व वन परिक्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर ते मालेवाडा वन परिक्षेत्रात दाखल झाले. दरम्यान १५ एप्रिल रोजी त्यांनी धानोरा तालुक्यातील खोब्रामेंढा येथील शेतकर्‍यांनी लागवड केलेल्या उन्हाळी धान पिकांची तसेच शेतातील झोपड्यांची नासधूस केली. यामुळे शेतकर्‍यांत नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ऑक्टोबर २0२२ मध्ये छत्तीसगड राज्यातून रानटी गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करून धानोरा तालुक्यात, कुरखेडा, कोरची, देसाईगंत तालुक्यातील अनेक गावातील खरीप हंगामातील धान पिक, घरांचे मोठे नुकसान केले होते. या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई अद्यापही मिळाली नाही. त्यानंतर दोन महिन्यापूर्वी रानटी हत्तींनी गडचिरोली जिल्ह्यातून छत्तीसगड राज्यात गेले होते. त्यामुळे शेतकर्‍यांनी सुटकेचा श्‍वास घेतला होता. परंतु सदर हत्ती पुन्हा छत्तीसगड राज्यातून धानोरा तालुक्यातील मुरूमगाव पूर्व वनपरिक्षेत्रात प्रवेश केला आहे. तेथून मालेवाडा वन परिक्षेत्रातील नियतक्षेत्र तलवारगडच्या जंगलात दाखल झाले आहे. या परिसरातील गांगसाय टोला मार्गाने १५ एप्रिलच्या रात्री खोब्रामेंढ नियतक्षेत्रात येऊन संपत पोरेटी व घनचू पोरेटी रा. खोब्रामेंढा यांनी लागवड केलेल्या उन्हाळी धान पिकाची नासधूस केली. त्यानंतर १६ एप्रिल रोजी रात्री खोब्रामेंढा येथील कुमारशहा कुंजाम यांच्या धान शेतीचे व रामसू पोरेटी यांच्या शेतातील झोपड्यांची नासधूस केली. रानटी हत्तींनी शेतकर्‍यांचे मोठे नुकसान केले आहे. सध्या रानटी हत्तींचा कळप येडसकूही उपक्षेत्रातील कक्ष क्रमांक ३५८ मध्ये प्रवेश केला आहे, अशी माहिती मालेवाडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेहर यांनी दिली.
रानटी हत्ती पुन्हा जिल्ह्यात दाखल होऊन शेतकर्‍यांच्या उन्हाळी पिकांची नासधूस करीत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तसेच नागरिकांमध्ये रानटी हत्तींची दहशत पसरली आहे.

Share