जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रीत
गोंदिया: युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तथा जिल्हा कीडा परिषद, गोंदिया द्वारे २०२०-२१ वर्षासाठी जिल्ह्यातील युवांनी केलेल्या समाज हिताच्या कार्याचा गौरव व्हावा व विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हास्तरावर युवा पुरस्कार २०२०-२१ देण्यात येणार आहे. या युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी केले आहे.
अर्ज 17 ते 21 एप्रिल 2023 (सुट्टीचे दिवस वगळून) या कालावधीत कार्यालयीन वेळेत वितरीत करण्यात येतील. परिपुर्ण भरलेले अर्ज 25 एप्रिल 2023 पर्यंत जिल्हा क्रीडा अधकारी कार्यालय, गोंदिया येथे स्विकारले जातील. जिल्हा युवा पुरस्कार (युवक व युवती स्वतंत्र) तसेच एक नोंदनीकृत संस्था यांना देण्यात येईल. सदरचा पुरस्कार गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम दहा हजार रुपये (युवक व युवती स्वतंत्र), प्रति संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह रोख रक्कम पन्नास हजार देऊन गौरविण्यात येणार आहे.
पात्रतेचे निकष– १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२० पर्यंतची कामगिरी या पुरस्कारासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात संबंधित जिल्ह्यामध्ये सलग 5 वर्षे वास्तव्य असले पाहिजे, पुरस्कार युवक-युवतीचे वय पुरस्कार वर्षातील 1 एप्रिल 2019 रोजी 13 वर्षे व 31 मार्च 2020 रोजी 35 वर्षे पर्यंत असावे. पुरस्कार व्यक्ती किंवा संस्थेस विभागून दिला जाणार नाही. पुरस्कार मरणोत्तर जाहिर करण्यात येणार नाही. केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहिल (उदा. वृत्तपत्र कात्रणे. प्रशस्तीपत्र, चित्रफिती व फोटो इत्यादी).
अर्जदार संस्था, युवक व युवतीने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्षे क्रियाशील कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्रक देणे आवश्यक राहिल. अर्जदार व्यक्तीचे कार्य हे स्वयंस्फुर्तीने केलेले असावे. एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाही. अर्जदार संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम किंवा मुंबई पब्लीक ट्रस्ट अॅक्ट 1950 नुसार पंजीबद्ध असावी.
अर्जदार संस्था नोंदणी झाल्यानंतर किमान पाच वर्षे कार्यरत असणे आवश्यक आहे. अर्जदार, संस्थेच्या सदस्यांचा पोलिस विभागाने प्रमाणित केलेल्या चारित्र्य पडताळणी दाखला (संबंधित क्षेत्रातील पोलीस स्टेशन) देणे आवश्यक राहिल. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी, गोंदिया यांनी कळविले आहे.