शोकांतिका❓अडीच वर्षांपासून कर्मचाऱ्यांना ना गणवेश, ना कापड!

गोंदिया◼️: एसटी महामंडळातील चालक व वाहकांना गेल्या अडीच वर्षांपासून गणवेश पुरविण्यात आला नाही. त्यामुळे या कर्मचार्‍यांना जुन्याच गणवेशावर कर्तव्य बजवावे लागत असून गणवेश न घातल्यास कारवाई करण्याचे संकेत दिले असल्याने चालक व वाहकांसमोर दुहेरी संकट उभे आहे.

अनेक चालक, वाहक कर्तव्यावर असताना गणवेश घालत नाही तसेच काही जण मद्यप्राशन करुन वाहन चालवतात, असे प्रकार आढळून आले असल्याचे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने म्हटले आहे. याबाबत तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रवाशांची सुरक्षीतता व चालक, वाहकांच्या सुस्थितीबाबत संबंधित अधिकार्‍यांना तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चालकाने मार्गावर जाण्यासाठी वाहन देताना त्याने मद्यप्राशन केले नाही, याची तपासणी करुन व तशी नोंद शेरावहीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे चालक, वाहकांनी पूर्ण गणवेशात असणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

गणवेश ही कर्मचार्‍यांची शान आहे, त्यांनी कर्तव्य गणवेशातच बजवावे, असा महामंडळाचा दंडक आहे. यासाठी महामंडळाकडून कर्मचार्‍यांना वर्षात दोन गणवेश किंवा गणवेशासाठी कापड दिले जायचे. मात्र गेल्या अडीच वर्षांपासून कापडही मिळाले नाही व गणवेशही. त्यामुळे कर्मचार्‍यांना जुने गणवेश घालून किंवा स्वखर्चाने गणवेश घेऊन कामावर जावे लागते. काही कर्मचारी स्वतः कापड खरेदी करुन गणवेश तयार करतात. तर काहींचा पँट वेगळ्या रंगाची व शर्ट वेगळ्या रंगाचा असे चित्र पहायला मिळते. शिवाय एकच गणवेश असेल तर तो धुण्याचाही प्रश्नही निर्माण होतो. त्यातच आता गणवेश नसल्यास कारवाई करण्याचे संकेत महामंडळाने दिल्यामुळे कर्मचारी दुहेरी संकटात सापडले आहेत.

Share