धान उत्पादकांची प्रतीक्षा संपली

गोंदिया ◼️: धान उत्पादक शेतकर्‍यांना आर्थिक बळ देण्यासाठी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने हेक्टरी 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याची घोषणा केली होती. ही घोषणा कृतित आणून सरकारने जिल्ह्यासाठी 169 कोटी 21 लाख 67 हजार 280 रुपयाचा निधी संबंधित विभागाकडे वर्ग केला आहे. लवकर लाभार्थी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात आभासी पद्धतीने रक्कम वर्ग केली जाणार आहे.

अडचणीत सापडलेल्या राज्यातील धान उत्पादक शेतकर्‍यांना बोनस द्यावा, अशी मागणी शेतकर्‍यांसह राजकीय पक्ष, विविध संघटनांनी शासनाकडे केली होती. या अनुषंगाने नागपूर येथील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी हेक्टरी 15 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा केली होती. 24 फेब्रुवारी रोजी शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने धान उत्पादक शेतकर्‍यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर 15 हजार रुपये बोनस देण्याचा शासन निर्णय निर्गमित केला. जिल्ह्यातील 1 लाख 51 हजार 194 नोंदणीकृत शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर थेट रक्कम जमा केली जाणार आहे.

राज्यातील धान उत्पादक शेतकर्‍यांना अनुदान वाटपासाठी शासनाने 1 हजार रुपये कोटींची आर्थिक तरतूद करून गोंदिया जिल्ह्यासाठी 169 कोटी 21 लाख 67 हजार 280 रुपयाचा निधी जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाकडे वर्ग केला आहे. जिल्ह्यात शेतकर्‍यांची संख्या 2 लाख 72 हजार आहे. पैकी जिल्हा पणनकार्यालयाकडे 1 लाख 15 हजार 836 व आदिवासी विकास महामंडळाकडे 35 हजार 358 शेतकर्‍यांनी धान विक्रीकरिता नोंदणी केली होती. या सर्व शेतकर्‍यांनाच बोनस रक्कम 2 हेक्टर क्षेत्रासाठीच देय राहणार आहे.

Share