संघर्ष समितीने उभारली समस्यांची गुढी

आमगाव ◼️आमगाव नगर परिषदेचा विषय शासनाद्वारे सर्वोच्य न्यायालयातील प्रलंबित आहे. त्यामुळे नगर परिषदेत समाविष्ठ आठ गावांचा विकास रखडला आहे. त्यामुळे आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता व मागणी मान्य करुन घेण्यासाठी नगर परिषद संर्घर्ष समितीच्या वतीने 21 मार्चपासून तहसील कार्यालयासमोर अनिश्चितकालीन साखळी उपोषण सुरु केले आहे. तर आज आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी मुख्य मार्गावर समस्याची गुढी उभारुन शासनाचे लक्ष वेधले.

आमगाव नगर परिषदेचा विषय शासनाद्वारे सर्वोच्य न्यायालयात मागील आठ वर्षांपासून प्रलंबित आहे. नगर परिषदेत प्रशासक राज सुरु असून नगर परिषदेत आमगाव, बनगाव, किडंगीपार, म्हाली, पद्मपूर, कुंभारटोली, बिरसी, रिसामा हे आठ गावे समाविष्ट आहे. या गावांतील नागरिक केंद्र व राज्य सरकारच्या योजनांपासून वंचित आहेत. नागरिकांना घरकूल, राष्ट्रीय रोजगार हमीच्या कामापासून वंचित व्हावे लागले, आर्थिक अडचणीत रोजगार उपलब्ध नसल्याने नागरिक हताश होऊन गेली आहेत. वाढीव लोकसंख्या प्रमाणात नवीन योजना नसल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गलिच्छ वस्त्या, गटारे यांची वाढती समस्यांनी नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे.

सन 2014 नंतर याठिकाणी सार्वत्रिक निवडणूक झाली नाही. लोकप्रतिनिधी निवडणूक झाली नसल्याने व योजना विकास निधी मंजूर करण्यात आले नाही. त्यामुळे या भागाचा विकास झाला नाही. याविषयाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व न्याय द्यावा, यासाठी वेळोवेळी शासन व प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र केवळ वेळकाढू धोरण होत असल्याने आपल्या मागण्यांसाठी या आठ गावातील संतप्त नागरिकांनी आपल्याला मध्यप्रदेश राज्यात विलीनीकरण करण्याच्या मागणीकरिता मुंडन मोर्चा, जनआक्रोश मोर्चा काढला.

परंतु या आंदोनलांची शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त नागरिक 21 मार्चपासून मागणी मान्य होत नाही तोपर्यंत अनिश्चितकालीन उपोषण तहसील कार्यालयासमोर सुरू केले. तर आज, 22 मार्च रोजी आंदोलकांनी समस्यांचे फलक व प्रतिकृती असलेली गुढी उभारुन शासनाचे लक्ष वेधले. यावेळी रवी क्षीरसागर, यशवंत मानकर, संजय बहेकार, उत्तम नंदेश्वर, नरेशकुमार माहेश्वरी, जिल्हा परिषद सदस्य सुरेश हर्षे, कमलबापू बहेकार यांनी नागरिक सहकार्याने गुढी उभारून समस्यांची घोषणाबाजी केली. यावेळी अजय खेतान, रामेश्वर श्यामसुंदर, पिंकेश शेंडे, प्रा. व्ही. डी. मेश्राम, महेश उके, युवराज उपराडे, ज्योती खोटोले, दिलीप टेंभरे, आनंद भावे, घनश्याम मेंढे, जगदीश शर्मा, रवी अग्रवाल, रितेश चुटे, उज्वल बैस, सीमा शेंडे आदी उपस्थित होते.

Share