प्रशिक्षणार्थी विमान कोसळून दोन वैमानिक ठार
गोंदिया: मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील भक्कूटोला गावशिवारातील जंगलात बिरसी येथील प्रशिक्षणार्थी विमान कोसळून दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. ही घटना आज शनिवार, 18 मार्च रोजी दुपारी 2 ते 3 वाजतादरम्यान घडली.
गोंदियाजवळील बिरसी विमानतळावरुन एक प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थीला घेऊन उड्डाण घेतलेले प्रशिक्षण विमान अनियंत्रीत होऊन मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील किरणापूर पोलीस ठाणे हद्दीतील भक्कुटोला गावाजवळील घनदाट जंगलात कोसळले व विमानाने पेट घेतला. या घटनेत दोन्ही वैमानिकाचा मृत्यू झाला. रुपशांका व मोहिम असे विमान प्रशिक्षणार्थींची नावे असल्याचे समजते.
या घटनेसंदर्भात बालाघाट जिल्हा अतिरिक्त पोलिस अधीक्षक (नक्षल) आदित्य मिश्रा यांनी सांगितले की, किरणापूर पोलिस हद्दीतील भक्कूटोला येथे एक प्रशिक्षणार्थी विमान कोसळल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आला आहे. तसेच बिरसी विमान पत्तन प्राधिकरणचे रफीक शाह यांनी, इग्रो कंपनीचे विमान काल सायंकाळपासून बेपत्ता होते. त्याबद्दल शेजारील जिल्ह्यात कळविण्यात आले होते. यातील पायलट व एक शिकाऊ पायलट कोण होते, याबद्दलची माहिती सध्या मला नाही. परंतु विमान आमच्या प्रशिक्षण केंद्रातीलच असल्याचे सांगितले. अपघातात पुर्णत मोडकळील आलेल्या प्रशिक्षणार्थी विमानाच्या ब्ॅलकबाँक्सच्या तपासणीनंतरच विमानात बिघाड आला होता की नाही याचा उलगडा होणार आहे.