इंग्रजीनंतर आता हिंदीच्या प्रश्नपत्रिकेतही चुका, विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ

नागपूर : विभागीय शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्नांमध्ये चूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर बुधवारी झालेल्या हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याचे समोर आले. दोन प्रश्नांमध्ये चुकीचे क्रमांक देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला.

बारावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली. यंदा कॉपीमुक्त अभियानांतर्गत परीक्षेदरम्यानचे गैरप्रकार रोखण्यासाठी शासनाने काटेकोर उपाययोजना केल्या. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्न चुकल्याचे समोर आले. प्रश्नपत्रिकेतील ए ३ आणि ए ५ या प्रश्नांसाठी केवळ सूचना नमूद केलेल्या होत्या, तर ए ४ या प्रश्नात प्रश्नाऐवजी थेट उत्तरच देण्यात आले होते. त्यामुळे या तीन प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला. असाच प्रकार बुधवारी झालेल्या हिंदीच्या पेपरमध्ये झाला.

हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक दोनमध्ये चार शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. मात्र, या शब्दांचे क्रमांक १,२,१,२ असे देण्यात आले आहेत. ते १,२,३,४ असे असायला हवे होते. तर चार समानार्थी शब्द लिहण्यासाठी दिलेल्या चारही शब्दांना १,१,१,१ असे क्रमांक देण्यात आले आहेत. हे १,२,३,४ असे असायला हवे होते. बोर्डाकडून अशी चुकी आज दुसऱ्यांदा झाल्याने प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. यंदा शिक्षण मंडळाने चुकांची मालिका सुरू केली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे

Share