80 वर्षाचे बहिण-भाऊ जगतात उपेक्षित जीवन, पिपरिया येथे झोपडीत आहेत वास्तव्याला

◼️सशस्त्र दूरक्षेत्र पोलिस चौकीचे कर्मचारी देतात एकवेळचा डबा

सालेकसा ◼️सत्तरीची वय उलटलेले बहिण आणि भाऊ सालेकसा तालुक्यातील पिपरीया येथे अनेक वर्षांपासून एकत्र राहतात. कुटुंब आणि नातेवाईक दुसरे कुणी नाही. त्यांच्याकडे आधारकार्ड आणि रेशनकार्ड देखील नाही. त्यामुळे शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ त्यांना मिळत नाही. झोपडीवजा घर आहे. वय झाल्यामुळे त्यांना कामधंदा देखील करता येत नाही. आजारपणात देखील अंथरूणाला खिळत बसून राहावे लागते. दोनवेळच्या जेवणाचीही भ्रांत आहे. त्यांना मदत म्हणून माणुसकीच्या नात्याने सशस्त्र दूरक्षेत्र पोलिस चौकीचे कर्मचारी एकवेळचा डबा पोहोचवून देतात. या वृद्ध बहिण- भावांना समाजाच्या मदतीची गरज आहे.

सालेकसा तालुक्यातील पिपरीया हे गाव दुर्गम आणि आदिवासी बहुल आहे. नक्षलरित्या देखील अतिसंवेदनशील आहे. तालुक्यातील सर्वात जास्त गावांची ग्राम पंचायत म्हणून देखील या गावाची ओळख आहे. सर्वाधिक नागरिक आदिवासी आहेत. या गावात अमरू उईके ( वय 85 ) आणि हेमा मडावी (वय 80 ) हे दोघेही बहिण-भाऊ सोबत राहतात. त्यांना नातलग म्हणून कुणाही नाहीत. अपत्य देखील नाहीत. एका पडक्या झोपडीत ते सोबत राहतात. एकमेकांवर त्यांचे जीवापाड प्रेम आहे. वयाची 80 उलटली असल्याने त्यांना आता कामधंदा देखील करता येत नाही.

त्यामुळे ते बहिणभाऊ घरीच राहतात.. उत्पन्नाचे देखील कसलेही साधन नाही. त्यातच त्यांच्याकडे आधारकार्ड किंवा कोणतेही ओळखपत्र नसल्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ देखील मिळत नाही. अंधारातच त्यांना रात्र काढावी लागते. दोनवेळच्या अन्नासाठी देखील त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागत आहे. कुणाला दया आल्यास त्यांना कपडे आणि अन्नधान्य देतात. बाजुलाच असलेला किराणा दुकानदार त्यांना मोफत धान्य देतो. तर पिपरीया येथील सशस्त्र दुरक्षेत्र पोलीस चौकीतील कर्मचारी त्यांना एकवेळचा जेवणाचा डबा पोहोचवून देतात. त्याच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. प्रकृती बिघडल्यास त्यांना घरीच उपचाराविना राहावे लागते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बहिण- भावाच्या अन्नधान्याची व्यवस्था करावी. सामाजिक संस्थांनी देखील पुढाकार घ्यावा, असे आवाहन गावातील नागरिकांनी केले आहे..

Print Friendly, PDF & Email
Share