तरुणाईला खर्रा, गांजा आणि दारूची लत, पालकांची चिंता वाढली!
◼️पालकांचे टेन्शन वाढले, तरुणाईला नशेची लत
देवरी ◼️ राज्यामध्ये सन 2012 पासून गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुपारी व इतर पदार्थाच्या विक्री व वापरास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. या प्रतिबंधित अन्य पदार्थाच्या बंदीची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत पोलिस विभागाच्या सहाय्याने करण्यात येते आहे. परंतु परराज्यातून मोठ्या प्रमाणावर गुटखा, गांजा अवैध पद्धतीने राज्यात आणला जातो तसेच वितरण आणि विक्री केली जाते. त्यामुळे जिल्हासह देवरी सारख्या मागासलेल्या तालुक्यात देखील राज्यशासनाच्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, गांजा आणि अवैद्य दारू विक्रीचे प्रमाण वाढलेले दिसत आहे.
तरुणाईची तंबाखू , खर्रा आणि गांजाकडे ओढ असल्याचे चित्र शहरी व ग्रामीण भागात बघावयास मिळत आहे. प्रतिबंधित पदार्थ सहजरित्या उपलब्ध होत असल्यामुळे तरुणाईला नशेची लत चढल्याचे चित्र आहे यामुळे पालकवर्गाची चिंता वाढलेली आहे. याकडे सबंधित प्रशासन काय भूमिका बजावतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
◼️कर्करोगाचा धोका तंबाखू खाणाऱ्यांना अधिक:
तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणे खानपान पद्धतीत-झालेले बदल आदी कारणांमुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातही कर्करोग रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्याने जिल्ह्यात कर्करोगाचा विळखा पसरत असल्याचे चित्र आहे.