बारावीच्या परीक्षेत इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत चुका!

नागपूर : राज्याच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या आजपासून सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत अनेक चुका असल्याची माहिती समोर आली आहे.

बारावी बोर्डाच्या इंग्रजी पेपर मध्ये तीन प्रश्नांमध्ये एका प्रश्नाऐवजी चक्क उत्तरच देण्यात आले आहे. तर इतर दोन प्रश्नांमध्ये प्रश्नाऐवजी तपासणाऱ्याला सूचना दिल्या आहेत. आता याचे नेमके काय उत्तर लिहावे? हे विद्यार्थ्यांना कळायला मार्ग नव्हता. त्यांनी निरिक्षकांच्या ही बाब लक्षात आणून दिली. त्यानंतर ही मोठी चूक असल्याचे स्पष्ट झाले.

बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. आज इंग्रजीचा पहिला पेपर होता. दरम्यान बोर्डाच्या परीक्षांची सुरुवात गोंधळाने झाल्याचे पाहायला मिळाले आहे. बोर्डाच्या चुकीमुळे बारावीच्या विद्यार्थी इंग्रजी पेपर सोडवताना संभ्रमात पडले. बोर्डाला आपली चूक लक्षात आली असून या गुणांची भरपाई विद्यार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे.

इंग्रजी पेपर मधील पान नंबर १० मध्ये हा प्रकार पाहायला मिळाला. येथे प्रश्न क्रमांक ए ३ इंग्रजी कवितेववर आधारित असणे अपेक्षित होते पण याजागी तपासणाऱ्याला सूचना छापून आली होती. 

ए ४ ला कवितेवर आधारित प्रश्न येणे अपेक्षित असताना त्याऐवजी उत्तरच छापण्यात आले आहे. , ए ५ हा प्रश्न देखील २ गुणांचा होता. आणि येथे देखील प्रश्नाऐवजी तपासणाऱ्याला देण्यात येणाऱ्या सूचना छापण्यात आल्या आहेत.

या तिन्ही प्रश्नांमध्ये विद्यार्थ्यांनी नेमकं करायचं काय हा प्रश्न दिलेला नाही. तसेच हे तिन्ही प्रश्न प्रत्येकी २ गुणांसाठी विचारण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थी हा प्रश्न सोडवण्यासंदर्भात संभ्रमात होते अनेक शाळांमध्ये या संदर्भात सूचना सुद्धा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावरील निरीक्षकांच्या ही बाब लक्षात आणून दिल्यावर त्यांचाही चांगलाच गोंधळ उडाला.

यावर बोर्डाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांमध्ये निदर्शनास आलेल्या त्रुटी बाबत मुख्य नियमांची संयुक्त सभा पुन्हा एकदा आयोजित करण्यात येईल. इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील त्रुटींबाबत संयुक्त सभेच्या अहवालानुसार विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share