आज बारावीच्या 74 केंद्रांवरून देणार 19363 विद्यार्थी परीक्षा

गोंदिया ◼️राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता 12 वीची परीक्षा आज, 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. जिल्ह्यात बारावीसाठी 74 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. या केंद्रांवरून 19363 विद्यार्थी परीक्षा देतील.

12th Exam

यासाठी गोंदिया तालुक्यात 22 परीक्षा केंद्र, आमगाव 7, सालेकसा 6, देवरी 6, अर्जुनी मोर 8, सडक अर्जुनी 7, गोरेगाव 7 व तिरोडा तालुक्यात 11 परीक्षा केंद्र आहेत. परीक्षा पारर्दर्शी, भयमुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी मिळून चार भरारी पथके तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मंडळाचे वेगळे पथक निर्माण करण्यात आले आहे. संवेदनशिल परीक्षा केंद्रांचे चित्रीकरणही करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यात एक भरारी पथक व प्रत्येक केंद्रावर पूर्ण वेळ बैठे पथक राहणार आहे.

कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी

गोंदिया जिल्ह्यातील बारावीच्या परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कॉपीमुक्त अभियानाची सर्वांनी प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले आहे.

Share