जिल्हात 74 केंद्रांवरून 12 वी च्या 19363 विद्यार्थ्यांची परीक्षा
गोंदिया◼️राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता 12 वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून व 10 वीची परीक्षा 2 मार्चपासून सुरू होत आहे. जिल्हा शिक्षण विभागाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. जिल्ह्यात बारावीसाठी 74 व दहावीसाठी 100 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. या केंद्रांवरून 12 वीचे 19363 व 10 वीचे 18224 असे एकूण 37 हजार 587 परिक्षार्थी परीक्षा देतील. परीक्षा पारर्दर्शी, भयमुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी सर्व घटकांनी दक्ष रहावे, सर्व मुख्याध्यापकांनी शाळा स्तरावर योग्य नियोजन करून परीक्षा कॉपीमुक्त करण्याचे आवाहन माध्यमिकचे शिक्षणाशिकारी कादर शेख यांनी केले आहे.
शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी मिळून चार भरारी पथके तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मंडळाचे वेगळे पथक राहणार आहे. संवेदनशिल परीक्षा केंद्रावर महसूल अधिकारी नियुक्त केले जातील. शक्यतोवर अशा केंद्रांचे चित्रीकरणही करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यात एक भरारी पथक व प्रत्येक केंद्रावर पूर्ण वेळ बैठे पथक राहणार आहे. परीक्षादरम्यान होणार्या गैरप्रकारावर आळा घालण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगीतले जाते. कोरोनाच्या संसर्गाने गेली 2 वर्षे विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात न जाता संभ्रमावस्थेतच परीक्षा द्यावी लागली होती. यंदा मात्र, चित्र वेगळे आहे. यंदाच्या शैक्षणिक सत्रांमध्ये नियमित शाळा-महाविद्यालये सुरु होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनात अडचणी आल्याचे दिसून आले नाही.
तालुकानिहाय परीक्षा केंद्र…
इयत्ता बारावी : गोंदिया 22, आमगाव 7, सालेकसा 6, देवरी 6, अर्जुनी मोर 8, सडक अर्जुनी 7, गोरेगाव 7 व तिरोडा 11.
इयत्ता दहावी : गोंदिया 31, आमगाव 10, सालेकसा 6, देवरी 9, अर्जुनी मोर 10, सडक अर्जुनी 9, गोरेगाव 10 व तिरोडा 15.