लाचखोर! कृषी पर्यवेक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात

गोंदिया : दोन हजार रुपयाची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एका आरोपीस आज रंगेहाथ अटक केली आहे. गोरेगाव तालुक्यातील कृषी अधिकारी कार्यालयात कृषी पर्यवेक्षक दिंगबर वेकुंठराव ठाकरे वय वर्ष ४६, रा. आंबाटोली, फुलचूर, गोंदिया, यास दोन हजार रुपयाची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज ०४ फेब्रुवारी रोजी रंगेहाथ अटक केली आहे.

तक्रारदार शेतकरी असून वडिलोपार्जित ९ एकर त्याची शेती आहे. एक एकर शेतजमीन ही मोठ्या बहिणीला देण्यात आली असल्यामुळे तक्रारदार हेच ती शेती सद्या करीत आहेत.

सदर ७/१२ बहिणीच्या नावे असलेल्या शेतजमीनीवर कृषी विभागाच्या वतीने शासकीय योजनेंतर्गंत भात मळणी मशीन मंजूर झाली.

तर खरेदी प्रकिया पुर्ण करण्यात आली आहे. परंतु मशीनची मौका तपासणी करुन कुठलीही त्रुटी न काढता अहवाल पाठविण्यासाठी २ हजार रुपयाची लाचेची मागणी केली.

तक्रारदाराला लाच मुळीच द्यायची इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे सापळा रचून पडताळणी केल्यानंतर लाचेची रक्कम तक्रारदार यांना देऊटोला येथील शेतात स्विकारतांना पथकाने रंगेहाथ पकडले. कलम ७ भ्रष्टचार प्रतिबंधित अधिनियम १९८८ अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कारवाई पोलीस उपअधिक्षक पुरुषोत्तम अहेरकर, पोलीस निरिक्षक अतुल तवाडे, फौजदार विजय खोब्रागडे, राजकुमार बोहरे, मंगेश कहालकर, संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, संगिता पटले, दिपक बाटबर्वे यांच्या पथाकने केली आहे.

Share