कोरोना काळात व्यापार्यांवर लावलेले 188 कलम रद्द करा
देवरी◼️ कोरोना संसर्ग प्रतिबंधकात्मक उपाययोजनेतंर्गत व्यावसायिकांवर कलम 188 अन्वये दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याची मागणी जिल्ह्यातील व्यावसायिकांकडून होत आहे. व्यावसायिकांनी तसे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.
संपूर्ण देशात 2019-20 व 2020-21 या दोन वर्षाच्या कालावधीत कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात होता. केंद्र व राज्य शासनाने कोरोना संसर्ग रोखण्याच्या उद्देशाने विविध नियम व अटी लावल्या. यातंर्गत कलम 188 लावण्यात आले होते. परंतु ज्या व्यवसायकांचे दुकान व निवास स्थान एकच असल्याने ते आपल्या दुकानासमोर बसले असल्यामुळे, त्यावेळी पोलिसांनी अशा व्यावसायकांवर कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई केली. त्यामुळे सध्या अशा व्यावसायकांना न्यायालयाच्या चकरा माराव्या लागत आहे.
कोरोना संसर्ग आटोक्यात आल्यानंतर केंद्र व राज्य शासनाने जे नियम व अटी लावलेले होते, ते सर्व नियम व अटी रद्द करून जनजीवन सुरळीत करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर कलम 188 रद्द करून व्यवसायकांना दिलासा द्यावा व न्यायालयात होणार्या त्रासापासून मुक्त करावे, अशी मागणी देवरी शहरासह जिल्ह्यातील व्यापार्यांनी केली आहे.