जो पर्यंत शेतकरी सुखी होणार नाही, तो पर्यंत कोणताही व्यक्ति सुखी होणार नाही-आमदार सहषराम कोरोटे
देवरी तालुक्यातील शेरपार येथे श्रीमद् भागवत सप्ताहचे आयोजन
देवरी ०८: आपला महाराष्ट्र हा साधुसंतांच्या विचारावर चालणारा राज्य आहे. या भूमिवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज सारख्या अनेक थोर संतांचा जन्म झाला. या संतानी समाजात समता, बंधुत्व व एकता कायम राहावी या करिता त्यांनी मनुष्याला मन, बुद्धि व संस्कार यावर प्रभुत्व मिळवुन आपल्या दैनंदिन जीवनात समाजाकरिता कशाप्रकारे कार्य करावे यावर अनेक प्रबोधन केले. आपल्या विदर्भातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी शेतकऱ्यांविषयी वेगळी भूमिका ठेवून आपल्या भजनाच्या माध्यमातून हा देश कृषि प्रधान देश असल्याने जो पर्यंत या देशातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिति बळकट होत नाही तो पर्यंत देशाची आर्थिक व्यवस्था बळकट होत नाही. कारण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था ही शेतीवरच आधारित आहे. म्हणून जो पर्यंत येथील शेतकरी सुखी होणार नाही तो पर्यंत देशातील कोणताही व्यक्ति सुखी होणार नाही. असे प्रतिपादन आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.
ते देवरी तालुक्यातील शेरपार येथे मंगळवारी (ता.०५ जानेवारी) रोजी श्रीमद् भागवत सप्ताहाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
या प्रसंगी कथावाचक वर्धा येथील विठ्ठलदास महाराज आणी शेरपार येथील जेष्ठ मंडळी महिला, पुरुष व युवक बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी शेरपार येथील ग्रामपंचायत मधील बिनविरोध निवडून आलेल्या सर्व ग्रा.पं.सदस्याचे अभिनंदन करुण शासनाच्या विविध योजनेतून २५ लाख रुपये निधिचे कामे त्वरित देण्याची घोषणा आमदार सहषराम कोरोटे यांनी केली.
या कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार शेरपारचे पोलिस पाटिल लालश्याम गावळ यांनी मानले.