आरटीई अंतर्गत एक हजार विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

गोंदिया◼️ शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राज्यातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असणार्‍या 25 टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया लागू असणार्‍या शाळांच्या नोंदणीची प्रक्रिया आजपासून सुरू झाली. गोंदिया जिल्ह्यात 145 शाळांमध्ये 1000 विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे. नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पालकांना अर्ज करता येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आली आहे.

RTE अंतर्गत होणार्‍या प्रवेश प्रक्रियेतून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील मुलांना खासगी शाळांमध्ये निःशुल्क प्रवेश घेण्याची संधी मिळते. त्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होते, याबाबत पालकांमध्ये उत्सुकता असते. यंदा ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेत खासगी शाळांना 23 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत नोंदणी करावी लागणार आहे. शाळांनी नोंदणी पूर्ण केल्यानंतरच पालकांना त्यांच्या पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज दाखल करता येणार आहे. गोंदिया जिल्ह्यात इंग्रजी माध्यमांच्या नामांकित 145 शाळांमध्ये 1 हजार विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे.

प्रवेशासाठी ही कागदपत्रे लागणार 

रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज किवा टेलिफोन बिल, प्रॉपर्टी टॅक्स देवक किंवा घरपट्टी, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, भाडे करार म्हणून दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी केल्याची प्रत आवश्यक आहे. जन्मतारखेचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा म्हणून सॅलरी स्लिप, तहसीलदाराचा दाखला, कंपनीचा दाखला, जात प्रमाणपत्र पुरावा, दिव्यांग मुलांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र असावे.

तर प्रवेश रद्द 

शिक्षण विभागाकडून पत्त्याची पडताळणी करण्यात येईल. पत्त्यावर मूल किंवा पालक राहत नसल्याचे आढळल्यास प्रवेश रद्द करण्यासोबतच कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

तपासणीसाठी समिती

अर्जाची प्रक्रिया झाल्यानंतर कागदपत्रांच्या तपासणीसाठी गटशिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करण्यात येणार आहे. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर शाळेत प्रवेश घेता येणार आहे.

Share