194 पदांसाठी 15 हजार उमेदवार रांगेत

गोंदिया: जिल्हा पोलिस विभागात रिक्त असलेल्या पोलिस शिपाई व चालक पोलिस शिपाई पदाच्या एकूण 194 जागेसाठी 2 जानेवारीपासून भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी तब्बल 14 हजार 676 युवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे व अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस भरती 2021 ची प्रक्रिया कारंजा येथील पोलिस मुख्यालयात आज 2 जानेवारी रोजी सकाळी 5 वाजतापासून सुरुवात झाली. पोलिस शिपायाच्या 172 व 22 पोलिस शिपाई पदाकरिता ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पोलिस शिपाई पदाकरिता 13 हजार 634 अर्ज प्राप्त झाले आहेत. तर चालक पोलिस शिपाई पदाकरिता 1041 उमेदवारांनी अर्ज केले आहे. प्रक्रियेदरम्यान, सर्वप्रथम पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर उमेदवारांची शारीरिक व मैदानी चाचणी प्रक्रिया घेण्यात येणार आहे.

संपूर्ण भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकरित्या व्हावी, यासाठी चोख पोलिस बंदोबस्तासह व्हीडिओग्राफी, सीसीटीव्हीच्या निगराणीमध्ये घेण्यात येणार आहे. शारीरिक व मैदानी चाचणी प्रक्रिया पार पडल्यानंतर यामधील पात्र उमेदवारांची पोलिस भरती सेवा प्रवेश नियमाप्रमाणे निवड यादी तयार करण्यात येवून लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्तेनुसार तात्पुरती निवड सूची तयार करण्यात येईल व तात्पुरत्या निवड सूचीमध्ये पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी केल्यानंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांचाच निवड सूचीमध्ये समावेश केला करण्यात येणार आहे. 

गोंदिया जिल्हा पोलिस दलातर्फे संपूर्ण पोलीस भरती (Police Recruitment) प्रक्रिया ही पारदर्शकरित्या पार पाडण्यात येणार आहे. त्यामुळे भरतीकरिता येणार्‍या उमेदवार, उमेदवारांच्या पालकांनी भरती प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारच्या आमिषाला, प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा पोलिस विभागातर्फे करण्यात आले आहे.

Share