48 तासात 90.45 लाखांची रक्कम लाभार्थ्यांना वर्ग

गोंदियाः पंतप्रधान मातृवंदना योजनेतंर्गत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मागील 48 तासात 90 लाख 45 हजार रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. तर 2022-23 या वर्षात आजपर्यंत जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यात 2 कोटी 14 लाख 33 हजार रुपये वर्ग झाले आहेत.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागातील गर्भवती महिलांना गर्भधारणेतून शेवटच्या टप्प्यापर्यंत तसेच प्रसुतीनंतरही शारिरीक क्षमता नसतांनाही मजुरीसाठी काम करावे लागते. अशा गर्भवती महिला व माता कुपोषित राहतात. त्यामुळे त्यांच्या व नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. यामुळे प्रथमत: गर्भवतीला तसेच स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी पंतप्रधान मातृ वंदना योजना राज्यात 2017 पासून सुरु केलेली आहे. या योजनेत केंद्र शासनाचा 60 टक्के व राज्य शासनाचा 40 टक्के वाटा असतो. प्रथम खेपेतील गर्भवती मातांना गरोदरपणापासून तर बाळाच्या जन्मापर्यंत तीन टप्प्यात 5 हजार रुपये मिळतात.

यासाठी गर्भधारणेपासून तर 150 दिवसाच्या आंत शासकीय आरोग्य संस्थेत नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र या योजनेअंतर्गत मातांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग करण्यासाठी असलेल्या सुविधेत मे 2022 या महिन्यापासून तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. ही अडचण दूर होताच मागील आठवड्यात आरोग्य प्रशासनाने गोंदिया जिल्ह्यातील लाभार्थी मातांच्या बँक खात्यात 90 लाख 45 हजार रुपयांची रक्कम वर्ग केलेले आहेत. तसेच सन 2022-23 या वर्षात आजपर्यंत गोंदिया जिल्ह्यातील लाभार्थींना 2 कोटी 14 लाख 33 हजार रुपयांची रक्कम प्रशासनाने वर्ग केलेली आहे. यात आमगाव तालुक्यातील लाभार्थ्यांना 26 लाख 3 हजार, अर्जुनी मोरगाव 20 लाख 63 हजार, देवरी 16 लाख 22 हजार, गोंदिया ग्रामीण 53 लाख 7 हजार, गोरेगाव 24 लाख 51 हजार, सडक अर्जुनी 14 लाख 48 हजार, सालेकसा 14 लाख 47 हजार, तिरोडा 23 लाख 49 हजार, गोंदिया शहरी 17 लाख 62 हजार व तिरोडा शहरी भागातील लाभार्थ्यांना 3 लाख 81 हजार रुपये देण्यात आले आहे.

Share