त्या मद्यधुंद शिक्षकावरील कारवाईचा प्रस्ताव सीओंकडे
गोंदियाः शिक्षकी पेशाला काळिमा फासणारा प्रकार गोरेगाव तालुक्यातील निंबा येथील शाळेत गुरुवारी उघडकीस आला होता. यानंतर शिक्षण प्रशासन खळबडून जागे झाले. मद्यधुंद शिक्षकावर कारवाईची मागणी सर्वच स्तरावरून होऊ लागली. शिक्षणाधिकारी यांनी गटशिक्षणाधिकारी यांना चौकशी करून त्यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे सूचित केले होते.
गोरेगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शिरसाट यांनी मद्यधुंद शिक्षक घनशाम मरसकोल्हेची चौकशी करून यासंबंधीचा अहवाल जिल्हा परिषद कार्यालयाकडे सादर केल्याची माहिती गोरेगाव पंचायत समितीचे सभापती मनोज बोपचे यांनी दिली. आता दारुड्या शिक्षक मरसकोल्हेवर मु‘य कार्यकारी अधिकारी कोणती कारवाई करतात याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.
मद्यधुंद शिक्षक घनश्याम मरसकोल्हेची संपूर्ण माहिती गटशिक्षणाधिकारी यांनी विभागाला पाठविली आहे. शिक्षकावर शिस्त भंगाची कारवाई करण्यासाठी चा अहवाल जि.प.मु‘य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. तेच याप्रकरणी अंतिम निर्णय घेणार असल्याचे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये यांनी सांगितले.