ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १०२ “लालपरी” झाल्या बुक

◼️परिवहन महामंडळाला लक्ष्मीचे दर्शन

गोंदिया : जिल्ह्यातील ३४८ ग्रामपंचायतींसाठी येत्या रविवारी (दि. १८) निवडणूक घेतली जात आहे. निवडणूक कर्मचारी व निवडणुकीचे साहित्य ने-आण करण्यासाठी राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या लालपरीची गरज पडते त्यानुसार, यंदा प्रशासनाने निवडणुकीसाठी १०२ लालपरींचे ‘बुकिंग’ केले आहे. यामध्ये जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा तसेच भंडारा जिल्ह्यातील साकोली आगारातून लालपरींचा पुरवठा केला जाणार आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेतल्या जात असून, यामध्ये जिल्ह्यातील ३४८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सध्या ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराचा काळ सुरू असून, येत्या रविवारी (दि. १८) मतदान प्रक्रिया त्यानुसार, घेतली जाणार आहे. यासाठी प्रशासनाकडूनही तयारी सुरू झाली आहे. मागील दोन वर्षे कोरोनामुळे लालपरीची चाके लॉकडाउनमध्ये अडकून पडली होती.

त्या काळात महामंडळाला कधी नव्हे तेवढा आर्थिक फटका सहन करावा लागला. कोरोनाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडते न पडते तोच महामंडळातील कर्मचारी संपावर गेले. सुमारे ६ महिने सुरू असलेल्या संपामुळे दुसऱ्यांदा महामंडळाला आघात सहन करावा लागला. त्यामुळे महामंडळासाठी मागील वर्षातील या दोन घटना अतिशय वेदनादायी ठरल्या. मात्र २०२२ मध्ये हे सर्व विघ्न संपुष्टात आले असून लालपरीची चाके पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेत फिरू लागली असून, मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्यासह ने-आण करावी लागते. यासाठी प्रशासनाकडून नेहमीच राज्यमार्ग परिवहन महामंडळाकडून लालपरीची मागणी केली जाते. यंदाही रविवारी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी १०२ लालपरींची ‘बुकिंग’ करण्यात आली आहेत.

Share