जिल्हातील जलसाठ्यात वाढ, तलाव आणि धरणात मुबलक पाणी साठा
गोंदियाः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात सरासरीच्या 40 टक्के अधिक पावसाची नोंद झाली. परिणामस्वरुप जिल्ह्यातील सर्वच लहान-मोठी जलाशये ओसंडले. ऑक्टोबरपर्यंत पाऊस बरसल्याने प्रकल्पातील पाण्याची सिंचनासाठी गरज भासली नाही. सर्वच प्रकल्पात अपेक्षित साठा आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नसल्याचे संकेत आहेत. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची भिषणता जाणवत नसली तरी मे, जून महिन्यात काही गावांना पाणी टंचाईची झळ पोहचते. यासाठी प्रशासनाला उपाययोजना म्हणून कुठे ना कुठे टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. मात्र यंदा जिल्ह्यातील जलाशयांमध्ये अतिरिक्त पाणीसाठा असल्याने जिल्हा टँकरमुक्त राहील अशी अपेक्षा आहे.
गोंदियाला तलावांचा जिल्हा म्हणून संबोधले जाते. प्रत्येक गावात तलाव पहावयास मिळते. पावसाळ्यातील अल्प पर्जन्यवृष्टीमुळे उन्हाळ्यापूर्वीच ही जलाशये तळ गाठतात. यंदा झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प ओसंडले. जिल्ह्यात 9 मध्यम प्रकल्प, 22 लघु प्रकल्प, 4 मोठे प्रकल्प आणि 38 जुने मालगुजारी तलाव असून 1300 हून अधिक लहान तलावांचा समावेश आहे. सर्वच जलाशयांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. आज स्थितीत इटियाडोह प्रकल्पात 98.26 टक्के साठा आहे. पुजारी टोला प्रकल्पात 97.79, कालीसराडमध्ये 96.87, कलपाथरी मध्यम प्रकल्प, कटंगी धरण, ओवारा, बेवारटोला तलाव शंभर टक्के भरले आहे. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांत 94.60 टक्के आणि लघु प्रकल्पात 95.31 टक्के तर जुन्या मालगुजारी तलावांमध्ये 92.80 टक्के पाणीसाठा आहे.